धुळे – कोरोना महामारीचा संकटकाळ सलग चालू राहिल्यामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव रेल्वे येत्या 13 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे खानदेश वासियांची प्रतीक्षा संपणार असून प्रवासाचा एक मार्ग खुला होणार आहे. दिवसातून दोन वेळेस ही रेल्वे धावणार असून रविवारी बंद राहिल; असे संबंधित अधिकार्यकडून सांगण्यात आले आहे.
या मार्गावर नऊ स्थानके आहेत. बस भाडे खर्चून ये-जा करू न शकणाार्या शेतकऱ्यांसाठी तसेच धुळ्यात येणाऱ्या गरीब मजुरांसाठी ही रेल्वे मोठा आधार ठरली आहे. त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाला देखील मोठी चालना देणारी ठरली आहे. मात्र ही रेल्वे सेवा थांबल्यापासून त्या सर्वांचीच गैरसोय झाली. 24 मार्च 2019 पासून धुळे ते चाळीसगाव धावणारी ही पॅसेंजर सेवा थांबवण्यात आली होती. ही रेल्वेसेवा सुरू व्हावी यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र चितोडकर व अन्य राजकीय पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आता प्रशासनाने 13 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
13 डिसेंबर पासून रोज चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.30 वाजता निघून धुळ्यात 7.35 मिनिटांनी पोहोचेल. धुळे येथून निघाल्यानंतर पुन्हा ही रेल्वे 8.55 मिनिटांनी चाळीसगाव येथे पोहोचेल. सायंकाळी 5.30 मिनिटांनी चाळीसगाव येथून निघून 6.35 मिनिटांनी धुळे येथे पोहोचेल व रात्री 8.50 ला ही रेल्वे चाळीसगाव स्थानकात पुन्हा परत जाईल. अशा प्रकारे दिवसातून दोन वेळेस ही रेल्वे धावणार असून रविवारी बंद राहिल.
ही रेल्वे सेवा सुरू होणार असल्यामुळे आता चाळीसगाव येथून धुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना अन्य वाहनांचे मोठे प्रवासी भाडे मोजण्याची गरज राहणार नाही आणि त्यामुळे मोठी सोय होणार आहे.