नगर – सरकारचे धोरण योग्य नाही. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. सरकारचे धोरण योग्य नाही. दहा दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे ‘जेलभरो आंदोलन’ करा, मी तुमच्यासमवेत राहीन, असे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी सांगितले. ‘मंदिर बचाव कृती समिती’ने समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना मंदिरे उघडण्याविषयी निवेदन दिले. त्या वेळी ते बोलत होते.
या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन हळूहळू सर्व आस्थापने आणि बाजार, तसेच दैनंदिन व्यवहार चालू केले आहेत; पण धार्मिक स्थळे अन् मंदिरे उघडण्यास अनुमती दिलेली नाही. वास्तविक पहाता सर्व देवस्थाने सरकारचे नियम आणि अटी पाळून भाविकांना दर्शन देण्यास सिद्ध आहेत.
मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी आम्ही वारंवार सरकारकडे करत आहोत. यासाठी ‘घंटानाद आंदोलन’, ‘मंदिर उघडा आंदोलन’ या प्रकारची आंदोलने करून सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्र सरकारने या मागणीची नोंद घेतली नाही. सरकार मद्यविक्रीला अनुमती देते; मात्र मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी अनुमती देत नाही. आपण महाराष्ट्र सरकारकडे मंदिरे आणि धार्मिक स्थळे चालू करण्याची मागणी करावी, ही विनंती !
निवेदन देतांना ‘मंदिर बचाव कृती समिती’चे सर्वश्री सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, वसंत लोढा, सिद्धार्थ दीक्षित, गणेश पलंगे, बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे आदी उपस्थित होते.