नंदुरबार – नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट तथा नाकाबंदी मोहिम राबवत दमदार कारवाई केली असून एकूण 4 अग्निशस्त्र, 5 जिवंत काडतुस, 3 धारदार शस्त्रांसह घरफोडीच्या गुन्ह्यातील व इतर गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गुन्ह्याशी संबंधित आरोपींची एकाच वेळी मोहिमेच्या स्वरूपात धरपकड राबवून सलग मोठी कारवाई घडवण्याचा नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासातील हा पहिला प्रसंग म्हणता येईल. यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या या कामगिरीबद्दल नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे व नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुकही केले जात आहे. तथापि गुटखा तस्करी, गोमांस तस्करी व तत्सम गुन्ह्यातील मोठे मासेही पकडले जावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविण्याचे नियोजन केले. या दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी हिस्ट्रीशिटर्स, गँग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले, चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणारे, Drunk and Drive, कारागृहातुन सुटुन आलेले, अशांचा शोध घेवून कायदेशीर कारवाईच्या सुचना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 50 अधिकारी व 368 अमलदार नेमण्यात आले होते. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असुन पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कॉबींग व नाकाबंदी) योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
अशी झाली विविध गुन्ह्यांची ऊकल
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान दारु पिवून वाहन चालवितांना आढळल्याने नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलमान्वये 28 गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा, म्हसावद पोलीस ठाण्यात नोंदलेल्या ना उघड घरफोडीच्या गुन्ह्यातील इनव्हर्टर, बॅटरी, अॅम्प्लीफायर LED TV व तिखोरा ता. शहादा येथील पदमावत माता मंदीतील देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगसुत्र चोरी, एक मोटार सायकलचोरी त्याचप्रमाणे मसावद येथील शाळेतील घरफोडी, लोहारा गावातील कापुस चोरी, असे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मालमत्ते विरुध्दचे एकुण 9 गुन्हे उघडकिस आणून 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 6 आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशवस्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 12 रेकॉर्डवरील आरोपींविरुध्द् गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचेकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले.
तसेच नंदुरबार शहर धडगांव, सारंगखेडा पोलीस ठाणे अभिलेखावरील फरार असलेल्या 11 आरोपीतांना देखील ताब्यात घेण्यात आले त्यांना मा. न्यायालयात पाठविण्यात आले आहे.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 30 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले. धडगांव गावात बस स्थानकासमोर महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला 37 हजार 290 रुपये किमंतीचा विमल गुटखा व 53 हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 90 हजार 290 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीविरुध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहादा पोलीस ठाणे हद्दीतील शिरुड चौफुलीवर संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे व पोलीस अमलदार विजय ढिवरे यांच्या समवेत जाऊन संशयीतास ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता 25 हजार रुपये किमंतीचे एक गावठी लोखंडी पिस्टल, 1 हजार रुपये कि. चे दोन जिवंत काडतुस आढळून आले. शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना नंदुरबार रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम संशयास्पदरीत्या फिरतांना आढळला. झडती घेतली असता त्याच्या ताव्यातून 55,000/-रु. कि. 2 गावठी बनावटीचे लोंखडी पिस्टल व 1500/- रु. किमतीचे 3 जिवंत काडतुस एकुण 56500/- रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवापुर शहरात लखानी पार्क परिसरात देवळफळी ते लहान चिंचपाडा जाणाऱ्या रोडलगत एक इसम संशयास्पदरीत्या फिरतांना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 25,000/- रु. कि. 1 गावठी बनावटीचे लोंखडी पिस्टल व 1000/- रु. किमतीचे 2 जिवंत काडतुस, असे एकूण 26000/-रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करुन त्याच्यावर नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच नवापूर, विसरवाडी, शहादा पोलीस ठाणे हद्दतीत संशयीतांकडे तलवार, गुप्ती, चाकु मिळुन आल्याने 3 आरोपीतांविरुध्द् भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत वैंदाणे गावात दोन जणांवर वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करीत 3 लाख 54 हजार 200 रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.