गीता जयंती निमित्त लेख:
विश्वकल्याणकारी श्रीमद्भगवद्गीता !
मानव जातीला पथर्शन करणारे विचार श्रीकृष्णाने आपला प्रिय शिष्य अर्जुन याला सांगितले ते विचार तत्त्वज्ञान ज्यात संग्रहित झाले तो युगानुयुगे मानवजातीला आनंदी जीवन जगण्याची शिकविण देणारा हिंदू धर्मातील महान ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता होय.
इतिहास तज्ज्ञांच्या मते अंदाजे पाच सहस्त्र वर्षांपूर्वीचे पुरातन आणि तितकेच अभिनव असे तत्वज्ञान श्रीमद्भगवद्गीतेत सामावले आहे. श्रीमदभगवद्गीता म्हणजे महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारतातील भीष्म पर्वातील 25 ते 42 अध्यायात हे 700 श्लोक होय. आपल्या प्रियजनांचा संहार करायचा हे पाहून हाताश झालेल्या अर्जुनाला उपदेश करताना हे मानसिक आणि आंतरिक विकास साधणारे तत्वज्ञान अवतरले. आज कुठे तरी पूर्णत्वापासून आणि आदर्शांपासून ढासळलेले जग आपणास दिसते, रोज सकाळी वर्तमानपत्र पाहिले तर मन उदास करणाऱ्या बातम्या जास्त दिसतात. जगण्याच्या एका बिकट वाकड्यातिकड्या चढ-उतारावर विनाशाच्या गर्तेत जवळ आपण उभे आहोत अशी जाणीव होते. आज कुठेतरी विसंगतता दिसते. एकीकडे विज्ञानाची नेत्रदीपक झेप तर दुसरीकडे तूटले पणा. पण या स्थितीला स्थिर मनाने स्वीकारून सामोरे जाण्याचे आत्मबळ देऊन मनोधैर्य वाढवते ती श्रीमद्भगवद्गीता.
गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्या मानव समाजासाठी हे अमोघ विचार अवतरले, तो समाज पुरातन काळापासून ते आजच्या संगणक युगापर्यंत कायम प्रेयसाच्या ओढीने अधोगतीकडे जाणारच आहे. महाभारताअंती द्रष्टे व्यास म्हणतात की,
ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष्य न च कश्चित् श्रुणोति माम् ।
धर्मादर्थश्च कामश्च सधर्मः किं न सेव्यते ।।
अर्थात : मी (भगवान वेदव्यास) दोन्ही हात उंचावून मोठ्या आवाजात लोकांना सांगत आहे, तरी कुणी माझे ऐकत नाही. अरे बाबांनो ! धर्माचे पालन केले, तर आपसुखच अर्थ आणि काम प्राप्त होतील, तर तुम्ही त्या धर्माचेच आचरण का बरे करत नाही ?
श्रीमद्भगवद्गीतेने समाजाला मनाच्या शक्तीची जाणीव करून दिली. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्थित आहे सर्वांमध्ये भगवंताला बघण्याची दृष्टी देऊन वैश्विक समानता व प्रेमाची शिकवण भगवद्गीतेने दिली. अटळ दुःख सहन करण्याची शक्ती व मनोबल गीतीने समाजाला दिले.
मरणं प्रकृतिः शरीरिणाम् ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक १५ म्हणजे ‘शरीर असलेल्याला मरण हे स्वाभाविक आहे.’
‘जायते (जन्म होणे), अस्ति (रहाणे), वर्धते (वाढ होणे), विपरिणमते (पालट होणे), अपक्षीयते (क्षय होणे), विनश्यति (नष्ट होणे)’, या देहाच्या अवस्था सांगितल्या आहेत. धनुर्धर अर्जुनाला या मनाच्या शक्तीची जाणीव होती. आपले मन ‘चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ३४ म्हणजे मन चंचल, व्याकुळ करणारे आणि वळवण्यास अत्यंत कठीण आहे. याचा उल्लेख अर्जुनाने प्रांजळपणे केला आहे. वार्याची मोट बांधणे जितके कठीण, तितके मन काबूत (ताब्यात) ठेवणे
कठीण असते. भगवद्गीता हे मनाचा अभ्यास करणारे मनो विश्लेषक महान साहित्य होय.
अनुसंधान, निदिध्यास, उजळणी, अभ्यास याचा ध्यास ठसावा; म्हणून गीतेत (अध्याय ६, श्लोक ३५; अध्याय १२, श्लोक ९ आणि १०; अध्याय ८, श्लोक ८) आणि इतरत्रही अभ्यासयोगाचा प्रभाव सांगितला आहे. वारा जर निवांत असला, तर दिव्याची ज्योत स्थिरपणे तेवते, तसेच मन स्थिर असेल, तर तेलात भिजलेल्या वातीआधारे तेल वर चढते, तसेच माणसाचा कल उन्नत विचारांकडे श्रेयसाकडे होतो.’ अशी विश्वाला जोडन्याची महान क्षमता असणारा ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता होय. अश्या या महान ग्रंथास गीता जयंती नीमित्त कोटी कोटी अभिवादन.
– डॉ० पी. एस. महाजन, संभाजीनगर