नंदुरबार – जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दलाने पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवत सव्वा लाख रुपयांचा गुटका, 63 हजार रुपयांचे मांस जप्त करण्यासह मद्यप्राशन केलेल्या 36 वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले तसेच विविध गुन्ह्यातील आरोपी देखील पकडले. दोन दिवसांपूर्वीच ऑल आउट ऑपरेशन राबवून 4 पिस्तूल, 6 काडतूस व 3 तलवारी जप्तीसह 9 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची मोठी कारवाई केली.
दिनांक 14/12/2021 च्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 44 अधिकारी व 287 अमंलदार नेमण्यात आले होते व संपूर्ण ऑल आऊटचे नेतृत्व पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी केले. त्याचप्रमाणे पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते.
जिल्हा पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान दारु पिवून वाहन चालविणाऱ्या 36 जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रकियाही सुरु करण्यात आली. चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरतांना आढळलेल्या रेकॉर्डवरील 11 आरोपींविरुध्द् विविध पोलीस ठाणेत गुन्हे दाखल करण्यात आले.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान आणखी 25 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 1 लाख 23 हजार 735 रुपये किमंतीची देशी विदेशी दारु, बियर असा मुद्देमाल व 40 हजार रुपये किमंतीचे अवैध दारु वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. तसेच 23 जुगाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 29 हजार 460 रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नवापुर शहरातील धडधड्या रेल्वे गेटजवळ महाराष्ट्रात प्रतिबंधीत व खाण्यास अपायकारक असलेला 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा 7 लाख रुपये किमंतीच्या चारचाकी वाहनासह जप्त करण्यात आला. याप्रकरणी 3 आरोपींविरुध्द् नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नंदुरबार शहरात अवैधरीत्या जनावरांचे मास उघड्यावर विक्री करीत असतांना आढळल्याने दोन्ही आरोपींकडून 63 हजार रुपय किमंतीचे जनावरांचे मास जप्त करण्यात आले व त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन-बेलेबल वॉरंटपैकी 187 नॉन बेलेवल वॉरंट व 131 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले 58 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले. तसेच नंदुरबार शहरात बस स्थानक समोर डी एस के मार्केट जवळ धारदार चाकु (सुरा) जेवण करणाऱ्या एका संशयिताविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेला पप्पु ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरेशी हा पोलीस अधीक्षक यांची अथवा न्यायालयाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता त्याच्या राहते घरी वास्तव्य करून असल्याचे आढळले. पोलिसांना पाहून तो पळून गेल्याने त्याच्या विरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आला.