वाचकांचं मत :
भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चिमात्य विज्ञान
भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चिमात्य विज्ञान पुष्कळ जवळ येत आहेत. स्वामी विवेकानंदांनी ही भविष्यवाणी केली होती की ” भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चिमात्य विज्ञान यांचा संयुक्तपणे अभ्यास केल्यावर जे समाजशास्त्र सिद्ध होईल ते विश्वामध्ये शांती आणेल.”
आज अनेक श्रेष्ठ वैज्ञानिक भारताच्या प्रमुख ग्रंथांचा गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे यांचा आधार घेताना दिसून येतात. 21व्या शतकात वैश्विक स्तरावर वैचारिक जगतातील अनेक पालट झालेले बघायला मिळतात इ. स. 17 ते 19 व्या शतकात जडवादाचा (मटेरिॲलिझम) प्रभाव जास्त होता. 19 व्या शतकाच्या शेवटी ‘वेदांत’ हा विषय स्वामी विवेकानंदांनी जगासमोर ठेवला. त्याबरोबरच 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आईन्स्टाईन यांनी मांडलेला सिद्धांत जडवादाला भ्रमित करणारा होता. नंतर 1935 सालचे नोबेल पारितोषिक विजेते श्रोडिंगर यांनी सांगितले “माझ्या शोधकार्यात जे सिद्धांत आणि पुस्तके मी लिहिली त्यावरून स्पष्टपणे भारतीय तत्वज्ञान सिद्ध होत आहे.” श्रेष्ठ अणुवैज्ञानिक डॉक्टर ओपेनहायमर यांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच गीतेतील अकराव्या अध्यायातील विश्व दर्शनाचे वर्णन केलेला श्लोक त्यांनी दिलेला आहे. 1984 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जीसेफसन हेही उपनिषदांनी प्रभावित झाले होते व ते उपनिषदातील अनेक उदाहरणे देतात. आज भारत अध्यात्माचे ज्ञान समाजापर्यंत पोहचवू शकतो.
21 वे शतक हे ज्ञानाचे युग आहे आणि ज्ञानाचे स्पष्टीकरण गीतेमध्ये 13 व्या अध्यायातील 11व्या श्लोकात दिलेले आहे.
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ।।
अर्थात – आत्मा आणि अनात्मा यांच्या विवेकज्ञानामध्ये सतत गढून जाणे, तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच सर्वत्र पहाणे, हे सर्व ज्ञान होय, आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे.
– डॉ०. पी.एस. महाजन, संभाजीनगर