जळगाव – कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात चाललेले राजीनामासत्र चालूच असून आता नवनियुक्त परीक्षा नियंत्रक प्रा. के. एफ. पवार यांनी राजीनामा दिल्याने विद्यापीठ परिसर ढवळून निघाला आहे. एकामागून एक जबाबदार अधिकारी, पदाधिकारी पदावरून बाजूला होण्याचा क्रम कुठ पर्यंत चालेल? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे. विद्यापीठातील कारभार यामुळे अधिकच चर्चेत आला असून निरनिराळ्या शंकाही उपस्थित होऊ लागल्या आहेत.
पी.पी. पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यापासून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. विद्यापिठाच्या भोंगळ कारभार मुळे व ठेकेदार यांच्या दबावाला बळी पडून त्यांनी अचानक राजीनामा दिला होता, असे म्हटले जाते. त्यानंतर लगेच संशोधन चोरी प्रकरणात नाव घेतले गेले म्हणून माजी प्र कुलगुरू माहुलीकर यांनी राजिनामा दिला होता. त्याला थोडा काळ लोटल्यावर परीक्षा नियंत्रक बी.बी. पाटील व भटू प्रसाद पाटील यांनी राजीनामा दिला. तोच गोहील यांनी राजीनामा दिला. दरम्यान, प्रभारी कुलसचिव म्हणून ऍड. भादलीकर यांची नियुक्ती झाली होती. पण त्यांनीही लगेच राजीनामा दिला. परीक्षा नियंत्रकपदी प्रा. के. एफ. पवार हे आताच नियुक्त झाले होते. त्यांनीही राजीनामा दिला आहे. कोणाच्या दबावामुळे हे राजीनामा सत्र सुरू आहे? हा प्रश्न करणारी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.
या राजीनाम्याच्या सत्रामागे नेमके कोणते कारण आहे याचा उलगडा अजूनही झालेला नाही. मात्र राजीनाम्याचे सत्र सतत सुरू राहिल्यास याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागणार असून त्यांच्या भविष्यावर तसेच विद्यापीठाच्या प्रतिमेवर प्रतिष्ठेवर परिणाम करणारी ही बाब आहे. म्हणून राजीनाम्याचे सत्र का सुरू आहे ? याचा खुलासा कुलगुरूंनी करावा; अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे माजी जिल्हा अध्यक्ष अँड कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव भूषण भदाणे यांनी केली आहे.