नंदुरबार – तालुक्यातील तिसी, भालेर, नगाव, शिंदगव्हाण भागातील एकाच वेळी 20 हून अधिक वीज रोहित्र म्हणजे डीप्या बंद ठेवल्या जात असल्याने संतप्त शेतकर्यांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला. या उद्रेकातूनच आज भालेर येथेे 5-6 गावातून एकत्र आलेल्या संतप्त जमावाने चक्क ग्रामपंचायत कार्यालयात 4 वीज कर्मचाऱ्यांना डांबून ठेवत मोठी खळबळ उडवून दिली. तथापि महावितरणचेे अधिकारी आणि पोलिस ताफा भालेर येथील घटनास्थळी धावून आल्यामुळे जमाव नियंत्रित झाला व पुढील अनर्थ टळला.
तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी यांनी वेळेवर गाड्या भरून पथक नेले व डांबलेल्या वीज कर्मचाऱ्यांची सुटका करीत जमाव नियंत्रित केला. याप्रसंगी जमावाची समजूत काढायला आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत संतप्त भावनांना वाट करून दिली. प्रमुख वाहिनीवर काहीतरी बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात येते व ती नादुरुस्ती तशीच ठेवून एकाच वेळी अनेक गावातील डीपीवरील वीज खंडीत ठेवली जाते, अशी या लोकांची तक्रार आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार घडवला गेला, असे समजते.
दरम्यान, वीज खंडित असल्यामुळे त्या शेकडो शेतकऱ्यांचे काम खोळंबले. विहिरीवरून शेतात पाणी देणे बंद झाले. परिणामी नुकतीच लागवड झालेली कांद्याची रोपे पाण्याविना सुकायला लागली आहेत तर ज्यांना लागवड करायची आहे त्यांचे काम खोळंबले असून हातातील रोपांची नासाडी सुरु झाली आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी अपेक्षा भालेर, तीसी, नगाव या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, लागोपाठ डीपी बंद पडण्याचा प्रकार घडवला जात असल्यामुळे शेतकरी यामुळे रडकुंडीस आले आहेत. शेतातील लागवडीची कामे आणि लागवड झालेल्या रोपांची जपणूक करणे गरजेचे असतानाच संबंधित अधिकारी दुरुस्त्या करण्याबाबत आडमुठी भूमिका घेत असल्याबद्दल शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बहुतांश शेतकरी विज बिल भरण्याला प्रतिसाद देत असताना थकबाकीदारांच्या नावाखाली खोंडामळी भागातच असा त्रास का दिला जातोय? थकित वीज बिल भरायला शेतकरी तयार असताना अधिकाऱ्यांनी आडमुठे धोरण वापरण्याची गरज काय? एकीकडे शेतकऱ्यांचा थकबाकी भरण्याला प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणच जाहीर करते. शेतकऱ्यांमुळे 2100 कोटी रुपयाची वसूली झाल्याचे महावितरण कडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे, मग असे असताना थकबाकी भरण्याच्या मानसिकतेत असलेल्या खोंडामळी भागातील शेतकऱ्यांची अडवणूक कशामुळे केली जात आहे? असे प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
भालेर, नगाव, तिसी, शिंदगव्हाण या भागातील काही शेतकऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीवरील तांत्रिक बिघाड असल्याचे निमित्त करून शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर 2021 पासून सुमारे 27 डीप्यांवरील पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. त्या बंद डीपीवर हजारहून अधिक शेतकऱ्यांचे कृषी पंप अवलंबून असतात. बंद पडलेले रोहित्र म्हणजे डीप्या चालू करण्यात न आल्याने त्या सर्वांना फटका बसला, असे भालेर, तिसी, नगाव गावातील काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकारी लक्ष देईना म्हणून शनिवार दरम्यान ग्रामस्थांनीच बिघाड दुरुस्त करून घेत विज चालू केली होती. ती काल पुन्हा खंडित केली गेल्यामुळे आजचा हा उद्रेक घडला.
ग्रामस्थांनी असेही सांगितले की, वीज पुरवठा कधी सुरू करणार याची विचारणा करण्यासाठी खोंडामळी येथील वीज वितरण शाखा कार्यालयात संपर्क केला असता शेतकऱ्यांना तेथील संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधान कारक उत्तर मिळत नाही. आधी थकबाकी भरा मग पुरवठा सुरू होईल; असे ऐकवून परतवणयात आले. तर काही शेतकऱ्यांना शनिवार रविवार लागून आलेल्या सुट्टीचे कारण सांगत सोमवार नंतर चालू करता येईल, असे सांगण्यात आले होते.