घातक हल्ला शिवसेनेने नव्हे तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घडवला; पण कोणाच्या इशार्‍यावर ? रोहिणी खडसेंचा प्रश्न

 

जळगाव — माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खेवलकर यांच्या गाडीवर दगड फेक करीत पिस्तूल, रॉड दाखवून काही अज्ञातांनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. दरम्यान, रोहिणी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना, हा हल्ला करणारे शिवसैनिक असल्याचा आरोप केला. यामुळे जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आघाडीची बिघाडी झाल्याचा अर्थ लावला जात आहे.

     तथापि, रोहिणी खेवलकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, शिवसेनेनेे नव्हे तर हा हल्ला शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घडवला आहे. ते कोणाच्या इशाऱ्यावर असे घडवत आहेत, याचा तपास झाला पाहिजे असेही रोहिणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रोहिणी खेवलकर या सूत गिरणी वरून कोथळी गावाकडे जात असताना रात्री ही घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने त्यांना इजा झालेली नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर मध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद घडत असून या वादात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व विद्यमान शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. अशातच घडलेल्या या घटनाक्रमाने आणखी राजकीय वादळ निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविषयी पोलीस अधीक्षकांना निवेदन  देणार आहेत. यामुळे मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद उभा ठाकल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रोहिणी खेवलकर यांनी हल्ल्याचा थरारक घटनाक्रम आज मंगळवार २८ दि. डिसेंबर रोजी कथन केला व बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत  केला. पत्रकार परिषदेत माजी मंत्री एकनाथराव खडसे देखील उपस्थित होते.
तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील तालुका अध्यक्ष छोटूभाई चांगदेव, ग्रामपंचायतचे सदस्य पंकज कोळी हे त्या हल्ल्यात असल्याचे त्यांनी सांगितले. यातील एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकाने आमच्या कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला.   हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. महिलांवर हात उचलेल त्या प्रत्येकाला चोप देईन; या माझ्या वक्तव्यावर मी अजूनही ठाम आहे असे देखील रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!