नंदुरबार – लाच मागितल्याप्रकरणी दाखल तक्रारींची तत्परतेने दखल घेत कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परीक्षेत्राने अव्वल स्थान पटकावले आहे, तर नाशिक परिक्षेत्राने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर युनिट प्रथम क्रमांकावर तर जळगाव युनिट दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर 2021 अखेर सापळा रचून केलेल्या कारवाई स्वरूपात तसेच अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 754 गुन्हे दाखल झालेत. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राने सर्वाधिक म्हणजे 162 गुन्हे दाखल केलेत. यामुळे गुन्हे दाखल करण्यात व चालू वर्षाषाअखेरच्या कामगिरीत या परीक्षेत्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. तर नाशिक परिक्षेत्राने चालू वर्षाअखेर 127 गुन्हे दाखल करून दुसरा क्रमांक पटकावला. मागील वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा 29 ने जास्त आहेत.
या प्रमाणेच नाशिक परिक्षेत्रातील जळगाव युनिटने सरत्या वर्षाअखेरपर्यंत 33 गुन्हे दाखल केले. मागील वर्षापेक्षा जास्तीचे 13 गुन्हे दाखल करण्याची कामगिरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक कडासने, जळगाव युनिटचे उपाधिक्षक एस.एस.पाटील यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले जात आहे. अहमदनगर युनिटने नासिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगर युनिटनेही 29 डिसेंबर 2021 अखेर पर्यंत 33 गुन्हे नोंदवले आहेत.