नंदुरबार – प्रत्येक जण सुंदर आणि स्वतःच्या पद्धतीने विशिष्ट असतो. तेव्हा शरिरातील नैसर्गिक बदलांना सामोरे जातांना वयात येणाऱ्या मुलींनी संकोच अथवा अपसमज न करता नॉर्मलच रहा, अशा शब्दात युवक भारती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा राजेंद्र शिंदे (एम.बी.बी.एस.पुणे) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
नंदुरबार तालुक्यात सुंदरदे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन तसेच किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहार या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम दि. ३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्याध्यापिका पुनम गिरी, रेखा चौधरी, सोनवणे या व्यासपीठावर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संदीप शेवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी शितल माळी हिने केले.
किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहार याविषयी जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले असून शाळा महाविद्यालयातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत आहेत. दरम्यान, राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये “जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याविषयी शासनाने परिपत्रक काढले आहे. सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करणे व यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचे त्यात म्हटले आहे. त्याला अनुषंगूनच प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. श्रध्दा राजेंद्र शिंदे (एम.बी.बी.एस.) यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ईयत्ता 7,8,9 व 10 वी च्या विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला.
प्रमुख मार्गदर्शनात डॉ. श्रध्दा राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक जण सुंदर आणि स्वतःच्या पद्धतीने विशिष्ट असतो. किशोरावस्था (साधारणपणे वयाची १० ते १९ ही वर्षे) किंवा वयात येणं हा मुलामुलींच्या आयुष्यातील विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात आपल्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. साहजिकच तुमच्या मनात याबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न,समस्या,शंका असतील, तर आज आपण त्यावर चर्चा करूया. हे सर्व बदल नैसर्गिक आहेत आणि प्रत्येकाला यातून जावे लागते. वयात येताना विविध बदल होत असताना कोणती काळजी घ्यायला हवी, आहार कसा असावा, पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखावी, या विषयी थोड आपण आज बोलूया. पाळी म्हणजे पवित्र किंवा अपवित्र असं काहीच नसत. पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे . या दिवसांमध्ये एकमेकाना जरूर मदत करा आणि एकमेकांची काळजी घ्या, असेही डॉ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.