नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश कोविड रुग्ण हे नंदुरबारच्या शहरी भागातील असून मोठ्या शहरांमधे वेगवेगळ्या कारणांनी जाऊन आलेल्या प्रवासी नागरिकांमुळे प्रसार वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी व चाचणी करून घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रोज कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याचे अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिले जात आहेत. 5 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वा. पर्यंतच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालयात 30 रुग्ण ऊपचार घेत होते. आज 6 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वा. पर्यंतच्या अहवालानुसार रुग्णसंख्या 38 झाली असून यात एकट्या नंदुरबार तालुक्यातील (किंबहुना शहरातील) 31 रुग्णांचा समावेश आहे.
या संदर्भाने नंदुरबार येथील तालुका प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील व शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण हे नंदुरबारच्या शहरी भागात आहेत. रुग्णांची संपर्कातील व्यक्तींची यादी आणि पत्ते यांचे अवलोकन केले असता सदर रुग्ण यांचा प्रवासाचा इतिहास असल्याचे स्पष्ट होत आहे. कुणी संघटनेच्या अधिवेशनासाठी हैदराबादला, कुणी व्यवसायासाठी मुंबईला, कुणी शासकीय कामासाठी पुणे भिवंडीला, कोणी पर्यटनासाठी सापुतारा गोवा, कुणी खरेदीसाठी सुरत आणि धार्मिक कार्यासाठी तिरुपती व शिर्डी असा प्रवास केल्याची आणि तिथे वास्तव्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालय येथे चाचणी करून घ्यावी; असे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विना मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर पोलीस, महसूल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी यांनी दंडनीय कारवाई करण्याची सूचित केलेले आहे. तसेच फौजदारी कारवाई देखील करण्याची सुध्दा तरतुद आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारात सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे तसेच कोरोना सुसंगत आचरणाचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः व्यापारी आस्थापना ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते अशा ठिकाणी दुकानांच्या मालकांनी व्यवस्थित आखणी करून ग्राहकांना दूर अंतरावर उभे राहण्यास सूचित करावे. वेळोवेळी हात धुणे आणि सॅनेटायझरचा वापर नागरिकांनी करावा; असेही तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आपल्या नजीकच्या दुकानास प्राधान्य द्यावे, निवडक खरेदीसाठी विशिष्ट बाजारपेठेत गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो…
लसीकरण माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे, पंधरा वर्षे वरील सर्व मुला मुलींचे लसीकरणासाठी तालुकास्तरीय नियोजन झाले असून निश्चित दिनांकास संबंधित शाळेतील सर्व पात्र मुला मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे, याबाबत दिनांक ३ जानेवारी रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक घेऊन सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी हे तालुकास्तरीय अधिकारी हे सर्व आपापसांत समन्वयाने कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर उभारणीसाठी नियोजन व अंमलबजावणी तसेच नियंत्रण व देखरेख ठेवून आहेत. सर्व जनतेने नियमांचे पालन करावे व लसीकरण करून घ्यावे; असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.