नंदुरबार – मागील अनेक वर्षात दाखल झाले नाहीत इतके गुन्हे नंदुरबार जिल्ह्यातील गोरक्षकांवर मागील अवघ्या काही आठवड्यात दाखल केले गेले असून केवळ गोतस्करांना संरक्षण देण्यासाठी व गोरक्षणाचे कार्य संपुष्टात आणण्यासाठी चालवलेले षडयंत्र यामागे असावे; अशा शब्दात नंदुरबार जिल्हा गोरक्षा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोष व्यक्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे गोरक्षकांनी केलेल्या तक्रारींचे आणि मागण्यांचे लवकरात लवकर निवारण न झाल्यास नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नंदुरबार जिल्हा गौरक्षा समितीचे केतन रघुवंशी, डॉ नरेंद्र पाटील, राजू गावित, अजय कासार, ऍड रोहन गिरासे, राजा साळी, अश्विन जयस्वाल, भूषण पाटील, अमन जव्हेरी, टायगर पावरा, संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. गोरक्षकांवर चालवलेल्या या अन्यायाविरोधात महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य न्यायाधीश, पोलीस आयुक्त, मानव अधिकार आयोग यांनाही आमचे निवेदन पाठविण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
केतन रघुवंशी यांनी सांगितले की, गोरक्षा समितीचे कार्य आणि भुमिका हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नसून गोतस्करीला रोखण्याच्या ऊद्देशानेच आहे. मध्यंतरी काही प्रमाणात गौतस्करीवर आळा बसला होता. परंतु गेल्या देन-तीन महिन्यांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोवंशाची वाहतूक सुरू झाली आहे. गोरक्षक दिवसरात्र पाळत ठेऊन पोलिसांना माहिती पुरवत असतात. परंतु कसायांशी संगनमत करून विनाचौकशी गाड्या अनेकवेळा सोडून दिल्याचे निदर्शनास आले. केतन रघुवंशी यांनी यासंबंधीत काही घटनांचा दाखला देत पुढे सांगितले की, गोरक्षक म्हणजे जणू काही गुन्हे करणार्या टोळ्या असल्याचे मानून सर्रासपणे गोरक्षकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा सपाटा पोलिस यंत्रणेने लावला आहे. ऊघडपणे या एकांगी चाललेल्या कारवाया अन्याय करणाऱ्या असून मानवी अधिकारांचे उल्लंघन देखील आहे. गोरक्षकांवरील सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.
एडवोकेट रोहन गिरासे यांनी सांगितले की, समितीचा लढा मुसलमान किंवा कसाई यांच्या विरोधात नाही. उलट आमच्या कार्याला अनेक मुस्लीमांची व काही कसायांची साथ आहे. कारण गायींची कत्तल थांबावी हीच भूमिका या सपोर्ट करणाऱ्यांची देखील आहे. नरेंद्र पाटील यांनी पोलिस कारवाई पक्षपाती असल्याचे स्पष्ट करणारे काही प्रश्न उपस्थित केले. गौरक्षकांना जिल्ह्यात होणारी गौहत्या व गौतस्करी दिसते मात्र पोलीस प्रशासनाला का दिसत नाही ? २५/११/२०२१ रोजी दाखल गुन्ह्यातील चामड्याने भरलेल्या पिकअप गाडीने ट्रकला धडक दिल्याने अपघात घडला होता. त्या प्रकरणात अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही? गोरक्षकांवर कसाईंनी दाखल केलेल्या गुन्ह्यात शहानिशा म्हणजे CC TV फुटेज, मोबाईल लोकेशन असे काहीही न तपासता गुन्हे कसे काय दाखल केले? असे प्रश्न उपस्थित केले.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजू दादा गावित यांनी गोरक्षा समितीच्यावतीने मांडलेल्या मागण्या अशा –
- गेल्या दोन महिन्यांत गोरक्षकांवर दाखल गुन्ह्यांची सखोल चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या फिर्यादी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- जिल्ह्यात गौवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
- जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांचा मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपणे विशेष पोलीस गौरक्षक पथक कायमस्वरूपी स्थापन करण्यात यावे.
- गौवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या, नकार देणाऱ्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.