वाचकांचे पत्र:
कायद्याचे रक्षक की भक्षक ?
जळगाव जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू असताना, एका पोलीस निरीक्षकाने आपला वाढदिवस गर्दीच्या ठिकाणी साजरा करून जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली. पोलीस ठाण्याच्या आवारातच गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला हा गुन्हा नाही का? पण आज कायद्याची भाषा करणाऱ्या या कायदे रक्षकांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. यावर थातुरमातुर कारवाई झाल्यास पुन्हा असे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता आहे. “जेवढा ज्ञानी तेवढी शिक्षा जास्त” या न्यायानुसार शिक्षा झाल्यासच अन्य कुणी असा कायदा पायदळी तुडवण्याचा प्रकार करणार नाही. कायद्याचा यांना किती आदर आहे हे यावरून स्पष्ट होते. असे पोलीस निरीक्षक समाजासमोर काय आदर्श ठेवणार ? शिस्त आणि कर्तव्य यांच्या कृतीतून दिसणार नसेल तर ते कायद्याचे रक्षक आहे हे तरी समाजाला कळेल काय? यासाठी स्वतः पेक्षा कायदा श्रेष्ठ आहे याची जाण सर्व पोलीस अधिकारी यांनी ठेवली पाहिजे तरच ते आदरणीय ठरेल.
– रवींद्र हेम्बाडे, जळगाव