नंदुरबार- शासनाने वापर व विक्रीस प्रतिबंध (बंदी) घातलेला नायलॉन मांजा विक्री करतांना एका विक्रेत्याला पकडण्यात आले व त्याच्याकडून 3100 रुपयांचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलिसांनी ही पहिली कारवाई केली असून नॉयलॉन मांजा विक्री करणार्यांवर पोलिस नजर ठेवून आहेत.
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी माहिती देतांना सांगितले की, मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यासाठी अनेकांकडून नॉयलान मांजाची विक्री व वापर होत असतो. परंतु नॉयलान मांजा नागरीकांसह पशुपक्ष्यांच्या जिवितासाठी धोकेदायक असतो. म्हणून जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करुन नॉयलान मांजा विक्री व वापरास प्रतिबंध केल्याचे आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात एक इसम नॉयलान मांजा विक्री करीत आहे. त्या माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने त्याठिकाणी जावून पाहणी केली असता जळका बाजार परिसरातील शिवाजी चौकात एका चहाचे दुकानाचे आडोश्याला एक इसम हातात प्लास्टीकची थैली घेवून प्रतिबंध असलेला नॉयलान मांजा विक्री करतांना आढळला. रविंद्र ईश्वर भिल (वय 25, रा.श्रॉफ हायस्कूल जवळील टेकडीवर, नंदुरबार) असे नाव सांगितले. त्याच्याकडून 1400 रुपये किंमतीचे मोनोकिट नॉयलान मांजा प्लाटीक कोटींग असलेला दोन मोठे नग प्रत्येकी 700 रुपये किंमतीप्रमाणे, 400 रुपये किंमतीचा एक नग मोनोगोल्ड नॉयलान मांजा, 800 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा असलेले 4 लहान नग प्रत्येकी 200 रुपये किंमतीचे, 300 रुपये किंमतीचा एक नग मोनो किट फिगटेर नॉयलान मांजा प्लास्टीक कोटींग असलेला व 200 रुपये किंमतीची एक लागडी चक्री सुरती मांजा नाव असलेला नॉयलान मांजा असा एकुण 3100 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोकॉ.शैलेंद्र दंगल माळी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भादंवि कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, असई.रविंद्र पवार, पोहकॉ.अतुल बिर्हाडे, पोना.नरेंद्र देवराज, पोना.स्वप्निल शिरसाठ, पोकॉ.शैलेंद्र माळी, पोकॉ.श्रीकांत पाटील, पोकॉ.विजय नागोडे, पोकॉ.राहुल पांढारकर, पोकॉ.विशाल मराठे यांच्या पथकाने केली.