नवी दिल्ली – भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ: सीडीएस) बिपीन रावत यांचा ज्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला त्या अपघाताच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे(सीओआय) प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या अपघातामागे तांत्रिक बिघाड, घातपात किंवा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची शक्यता कोर्ट ऑफ इन्क्वायरीने फेटाळून लावली असून निराळेच कारण नमूद केले आहे.
भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ: सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. हवाई दलाच्या ‘एमआय-17-व्ही-5’ या विमानातून रावत यांच्यासह त्यांची पत्नी, काही उच्चपदस्थ सेनाधिकारी आणि इतर कर्मचारी जात असताना तामिळनाडूतील कुन्नूर इथे 8 डिसेंबर 2021 रोजी हा अपघात झाला.
विशेष असे की, अपघात झालेले हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली समजले जाते. वायूदलातील सर्वश्रेष्ठ हेलिकॉप्टर्सपैकी एक होते. 26/11 च्या कमांडो ऑपरेशनमध्येही याचा वापर झाला होता. असे सांगण्यात आले होते की, अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज अशा या हेलिकॉप्टरमधे 5 क्षेपणास्त्र, एस-8 रॉकेट, एक 23 मिमी मशीनगन आणि पीकेटी मशीनगनसह 8 फायरिंग पोस्ट आहेत. यातील तंत्रज्ञानामुळे रात्रीही सहज कारवाई करता येते. हे विमान भारतीय हवाई दलाच्या अनेक बचाव आणि मदत कार्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मग असे असतांना हा अपघात व्हायला नेमके काय कारणीभूत ठरले ? हा प्रश्न अद्याप चर्चेत आहे.
दरम्यान, आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी शासकीय स्तरावरून प्रसारित करण्यात आलेल्या एका माहितीत म्हटले आहे की, 8 डिसेंबर 2021 रोजी एमआय-17 व्ही 5 च्या अपघातासंदर्भात त्रि-सेवा कोर्ट ऑफ इन्क्वायरीने आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत. चौकशी पथकाने या अपघाताच्या सर्वात जास्त संभाव्य कारणाचा शोध घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साक्षीदारांची चौकशी करण्याबरोबरच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची तपासणी केली.
या अपघातामागे तांत्रिक बिघाड, घातपात किंवा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची शक्यता कोर्ट ऑफ इन्क्वायरीने फेटाळून लावली आहे. हा अपघात या खोऱ्यात अचानक हवामानात झालेल्या बदलांमुळे हेलिकॉप्टरने ढगांमध्ये प्रवेश केल्यामुळे झाला. या निष्कर्षांच्या आधारे कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही सूचना केल्या असून त्याचा आढावा घेतला जात आहे, असे शासकीय माहितीत म्हटले आहे.