जळगाव – टक्केवारीच्या वरकमाईला चटावलेले शासकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकण्याचे प्रमाण वाढले असून सुमारे सव्वा लाख रुपयांची लाच घेतांना जळगाव जिल्ह्यातील एक वन परिक्षेत्रीय अधिकारी अशाच प्रकारे रंगेहात पकडला गेला. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज 18 जानेवारी रोजी ही धडक कारवाई केली.
तक्रारदार हे औरंगाबाद येथील शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वन विभागाकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर रोपवन अंतर्गत चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम पाल क.नं.५५, लोहारा क.नं.२४ व जिनसी क.नं.९ असे तीन कामे ऑनलाईन ई-निवेदेव्दारे रितसर मिळवलेले होते. तीनही कामांपैकी पाल क.नं.५५ हे काम पूर्ण झालेले असून सदर कामाचा 26,00,00/- रूपयांचा धनादेश त्यांना मिळालेला आहे व लोहारा क.नं.२४ चे काम पूर्ण झालेले आहे. परंतु पाल व लोहारा या दोन्ही कामांचे ५% प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगून जिल्ह्यातील रावेर ता. रावेर वन परीक्षेत्रीय विभागाचे वन परिक्षेत्रीय अधिकारी (RFO) मुकेश हरी महाजन, (वय-४५) वर्ग-२ यांनी 1 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितली व 22 नोव्हेंबर 2021 पासून धनादेश रखडवला होता. याविषयी तक्रार संबंधित ठेकेदाराने दिली होती.
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊन आज दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी सापळा रचला. तेव्हा वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश महाजन यांनी ५% प्रमाणे तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रथम 1,30,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 1,15,000 रुपये लाच घेत असतांना पथकाने झडप घालून पकडले व त्यांच्याविरुध्द आज दि.१८ जानेवारी २०२२ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर दुपारी सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्र अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांनी ही कारवाई केली.
सापळा रचून कारवाई करणाऱ्या पथकात स्वतः जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, निरिक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील व सुरेश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पोलिस नायक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, नासिर, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांचा समावेश आहे.