अतीदूर्गम भागात ‘धनुष्य बाणा’चा प्रथमच बोलबाला; मंत्री पाडवींना धक्का देत शिवसेनेचा दणदणीत विजय

नंदुरबार – धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या तिरंगी चुरशीच्या लढाईत 13 जागा पटकावून शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या पँनलला फक्त तीन जागा मिळाल्याने काँग्रेसचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या बालेकिल्ल्याला हा धक्का मानला जात आहे. भारतीय जनता पार्टीला केवळ एकच जागा मिळाल्याने खासदार डॉक्टर हिना गावित तसेच माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रतिष्ठेला येथे तडा गेल्याचे मानले जात आहे.

मंत्री के सी पाडवी हे सलग सात वेळेस धडगाव अक्कलकुवा भागातून विधानसभेवर निवडून आले आहेत. काँग्रेसचे पर्यायाने के.सी.गटाचे धडगाव तालुक्यात पारंपारिक वर्चस्व आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूकप्रसंगी मंत्री के सी पाडवी यांच्याशी काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मतभेद झाले होते. अशातच काँग्रेस पक्ष सोडून चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत आले. तेव्हा पासून काँग्रेस व शिवसेनेत राजकीय संघर्ष घडत आहे. केसी यांच्या बालेकिल्ल्यात विजयसिंग पराडके, धनसिंग पावरा या के.सी.विरोधक स्थानिक नेत्यांनी चांगली पकड निर्माण केली आहे. तेच रघुवंशी यांच्या कामी आलेले दिसले. विजयसिंग पराडके यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 17 उमेदवार उभे करून रघुवंशी यांनी एकाच वेळी भाजपा आणि काँग्रेस यांना लढा दिला. परिणामी प्रथमच आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिवसेनेने भगवा फडकवला. धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या या 17 जागांपैकी शिवसेना 13 जागांवर, काँग्रेस 3 तर भाजपा 1 जागेवर विजयी झाले. दरम्यान, आज धडगाव तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जात असतांना शिवसेनेचे विजय पराडके, धनसिंग पावरा, गणेश पराडके यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला.

भाजपा-काँग्रेसच्या भ्रष्ट युतीला लोकांनीच
पराभूत केले – चंद्रकांत रघुवंशी
मंत्री के सी पाडवी यांना महा विकास आघाडी शी बांधील राहून आपण आघाडी बनवूया असा प्रस्ताव दिला होता परंतु त्यांनी नाकारला परिणामी आम्हाला स्वतंत्र लढावे लागले. या उलट भाजपा आणि काँग्रेस मिळून आम्हाला प्रत्येक ठिकाणी पराभूत करण्याचा प्रयत्न झाला. त्या भ्रष्ट युतीला स्थानिक आदिवासींनी मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे मतपेटीतून दिसले. अतिदुर्गम भागात धनुष्यबाण आणि भगव्याला स्थान मिळवून देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शवणाऱ्या आदिवासींचे मी आभार मानतो, असे शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी म्हणाले.

 

आमच्या कार्यदिशेवर लोकांचा विश्वास
दर्शवणारा हा विजय – विजयसिंग पराडके
चंद्रकांत रघुवंशी यांचे नेतृत्व स्थानिक मतदारांचा आमच्या कार्यावर असलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच दणदणीत विजय मिळाला. आदिवासी मतदार पक्ष चिन्ह किंवा मोठाले पद याला भाळत नाही. दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्यांनाच ते साथ देतात, असे विजयसिंग पराडके म्हणाले.

विजयी ऊमेदवारांची नावे अशी –

प्रभाग 1 अनु.जमाती पावरा ललीता तुकाराम – भाजपा विजयी, प्रभाग 2 अनु.जमाती पावरा ललीता संजय -काँग्रेस विजयी, प्रभाग 3 सर्वसाधारण, पावरा कल्याणसिंग भरतसिंग काँग्रेस विजयी, प्रभाग 4 अनु.जमाती पराडके भरतसिंग पारशी शिवसेना विजयी, प्रभाग 5 अनु.जमाती पावरा रघुनाथ विरसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 6 अनु.जमाती पावरा राजेंद्र गुलाबसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 7 अनु.जमाती सरदार पारशी पावरा शिवसेना विजयी, प्रभाग 8 अनु.जमाती ब्राम्हणे विजय छगन शिवसेना विजयी, प्रभाग 9 अनु.जमाती (स्त्री) चव्हाण भावना मिनेश शिवसेना विजयी, प्रभाग 10 अनु.जमाती (स्त्री) पावरा कविता राॅकेश शिवसेना विजयी, प्रभाग 11 अनु.जमाती (स्त्री) पराडके दिपीका जामसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 12 पावरा धनसिंग दादला शिवसेना विजयी, प्रभाग 13 सर्वसाधारण, पावरा पुरुषोत्तम दिलवरसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 14 सर्वसधारण पावरा गिरजा अंबाजी काँग्रेस विजयी, प्रभाग 15 सर्वसाधारण (स्त्री) पावरा सुनंदाबाई हेमंत शिवसेना विजयी, प्रभाग 16 अनु.जमाती (स्त्री) वळवी विद्या शिवराम शिवसेना विजयी, प्रभाग 17 अनु.जमाती (स्त्री) पराडके शर्मिला जमसर शिवसेना हे विजयी झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!