सांभाळा! ‘या’ हवामान अंदाजाने वाढवलीय ‘व्हायरल ईनफेक्शन’ची चिंता

नंदुरबार – प्रचंड थकवा येऊन डोकेदुखी, अंगदुखी, खोकला, घसा दुखीने त्रस्त होण्याची लक्षणे असलेले रुग्ण अचानक शेकडोच्या संख्येने आठवडाभरात वाढले आहेत. ओमायक्रॉनने बाधीत झाल्याची शंका येऊन यापैकी अनेकजण बड्या रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. नंदुरबार शहरातील छोट्या मोठ्या खाजगी रुग्णालयातून उपचारार्थ येणार्‍या अशा रुग्णांची संख्या दिवसाकाठी २०० च्या आसपास आहे, तर शासकीय स्तरावरून पॉझिटिव घोषित होणार्‍यांची संख्याही दिवसाला सव्वाशे ते दिडशे ईतकी आहे. यासर्व पार्श्‍वभुमीवर हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज रुग्णाईतांची चिंता वाढवणारा आहे. कारण हवामान विभागाने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची नोंद करीत अवकाळीची शक्यता वर्तवली. शिवाय नंदुरबारचे  तापमान थेट १० अंशसेल्सिअसपर्यंत घसरण्याचीही दाट शक्यता सांगितली आहे. हा अंदाज लक्षात घेता रोगट हवामानात भर पडून हे आजार आणखी बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि जंतूसंसर्ग (व्हायरल ईनफेक्शन) झालेल्या रुग्णांनी घाबरून जाऊ नये; असे आवाहन आधुनिक वैद्यांनी केले आहे.

आधी अवकाळी पाऊस, नंतर सलग अनेक दिवस धुके, त्या पाठोपाठ पुन्हा पावसाच्या सरी, मग गोठवणारी थंडी असे वातावरणीय बदल वारंवार घडत आहेत. या दरम्यान, अनेकदा सूर्यकिरणे क्षीण होणे, सूर्यप्रकाशाची तीव्रता नसणे, हवामान सतत कुंद सर्द रहाणे असे घडत गेले. शरीर गोठवणार्‍या गार वार्‍यांनी यात अधिक भर घातली. मागील तीन महिन्यात हे असे क्रमाने घडत असल्याने प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या. सांधे दुखी, अंगदुखी, हाडे ठणकणे, डोकेदुखी यासह नर्वसपणानेही अनेकांना घेरले. नोव्हेंबर आणि डिसेंबरमधे असे होते. परंतु या रोगट हवामानाचा जानेवारीतही मुक्काम कायम आहे. परिणामी आजारपणाचे प्रकार आणि तक्रारी वाढतच चालले आहेत. काहीजण ओमायक्रॉनलाही हलकेपणाने घेत आहेत हा विषय निराळा. परंतु सध्या घरा घरातून पसरलेला अशक्तपणाचा व अंगदुखीचा आजार अनेकांना हैराण करीत आहे. मागील आठ दहा दिवसात आलेल्या या जंतूसंसर्गा (व्हायरल ईनफेक्शन)ने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मनाला व शरीराला अचानक खुप थकवा येऊन डोके दुखणे, अंगदुखणे, खोकला येणे, थंडी भरणे, घसा खवखवणे असे काही त्रास होतात. सोबतच बारीक ताप येतो. या त्रासाची तीव्रता तीन दिवस रहाते आणि नंतर कमी-कमी होत जाते.

रुग्णांनो घाबरू नका !
हे दुखणे म्हणजे ओमायक्रॉन नाही, असे काही आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार फार गंभीर नसल्याने घाबरून जाऊ नका, असे जाणकार आधुनिक वैद्यांनी केले आहे. विद्यासरोज क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉ.गौरव तांबोळी व डॉ.स्वप्निल महाजन यांनी सांगितले की, जंतूसंसर्ग झालेल्या रुग्ण आमच्या रुग्णालयात तपासणीला येण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्क्याने वाढले आहे. असले त्रास जाणवणारा प्रत्येकजण ओमायक्रॉन बाधीत समजण्याचे कारण नाही. आवश्यकता असलेल्यांना आम्ही चाचणी करवून घेण्याचा सल्ला मात्र देत आहोत. स्मिथ मल्टीस्पेशल हॉस्पिटलच्या डॉ.तेजल चौधरी म्हणाल्या की, जंतूसंसर्गाचा वाढता प्रकार चिंताजनक आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांच्या काही केसेस लक्षात घेता ओमायक्रॉनची लागण बालवयीन मुलांना होऊ नये, याची दक्षता पालकांनी आवर्जून घ्यावी. परस्पर अर्थ लावण्याऐवजी रुग्णांनी चाचणी करून घेणे अधिक योग्य वाटते; असेही डॉ.तेजल चौधरी म्हणाल्या.  दीर्घकाळापासून रुग्णसेवेत असलेले डॉ.मनोज तांबोळी यांनी सांगितले की, रोज दिवसाकाठी पन्नासहून अधिक वरील लक्षणांचे रुग्ण तपासायला येताहेत. पण ते सर्व ओमायक्रॉनचे नाहित. हा ओमायक्रॉन सदृष्य त्रास असला तरी वेळेवर घेतलेल्या साध्या उपचारांनाही बरे होताहेत. घाबरून जात कोणीही महागडे उपचार घेऊन खर्चात पडण्याची आवश्यकता नाही. दुसर्‍या लाटेप्रसंगी अनावश्यक खर्चाने जनता होरपळली होती. तसे आता होता कामा नये असे वाटते, असेही डॉ.तांबोळी म्हणाले. आमच्याकडे रोज किमान ३० रुग्ण तपासणीला येताहेत आणि ते कमी खर्चात बरेही होत आहेत, असे डॉ.रविंद्र गोसावी यांनी सांगितले. उपाय म्हणून प्रत्येकाने गरम कपडे वापरावे, आंतरिक उर्जा वाढवणार्‍या हलक्या आहाराला प्राधान्य द्यावे, पचनास जड वातूळ चटकदार पदार्थ आणि थंड पेय, पदार्थ टाळावेत; अशा सूचनाही केल्या आहेत.

रुग्णांची संख्या हजारात?
हा त्रास जाणवणार्‍यांची संख्या शेकडो नव्हे तर हजारोच्या घरात असावी. छोट्या-मोठ्या दवाखान्यांमधील व रुग्णालयांमधील माहिती घेतल्यास याचा अंदाज येतो. साधी डिस्पेन्सरी चालवणारे काही डॉक्टर मागील आठवड्यापासून दिवसाकाठी २५ ते ४० रुग्ण रोज हाताळत आहेत. मध्यम व मोठ्या स्वरुपातील रुग्णालयांकडील संख्या दुप्पट आहे. ते सर्वच दाखल होताहेत असे नाही. घरच्या घरी बरे होणार्‍यांची संख्या मोठी आहे. यामुळेच खरी रुग्ण संख्या रेकॉर्डवर येऊ शकलेली नाही. यातील काही जण कोरोना झाल्याच्या शंकेने मोठ्या खर्चात पडत आहेत. काही रुग्ण कोरोना झाल्याच्या शंकेने चाचण्या करवून घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात गर्दी करीत आहेत. रोज सरासरी ५०० जणांची तपासणी व चाचण्या केल्या जात आहेत. वर सांगितलेल्या दुखण्यासोबतच हातापायाला खाज येऊन त्वचेवर रॅशेस, अंगावर लालचट्टे अथवा पुरळ उठल्यास ते ओमायक्रॉनचे लक्षण मानावे, असे वैद्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल झालेल्या व उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज दि.२१ जानेवारी २०२२च्या दुपारपर्यंत १ हजार ७९० ईतकी झाली. यात नंदुरबार ७२५, नवापूर ४५४, शहादा ३९८, तळोदा ११५, अक्कलकुवा ९२ तर धडगावला ६ रुग्ण आहेत. आज १ हजार ३८३ जणांनी चाचण्या करवून घेतल्या. यात आरटीपीसीआर चाचण्या करवून घेणार्‍यांची संख्या ८४२ तर रॅपिड टेस्ट करवून घेणार्‍यांची संख्या ५४१ आहे. कोरोना पॉझिटिव आढळलेल्यांची संख्या ३७४ आहे. यातील फक्त ६ दाखल आहेत तर अन्य ३६९ होमआयसोलेशनमधे आहेत.

गोठवणारी थंडी चिंता वाढवणार ?
अशातच भारतीय हवामान विभागाने आज पालघर,नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची नोंद करीत उत्तर महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता वर्तवली. यामुळे शेतकर्‍यांचीही चिंता वाढली आहे. २३ ते २६ जानेवारी रोजी हवामान कोरडे राहिल परंतु तापमान घसरून थंडी वाढणार आहे. किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. जेव्हा नंदुरबारचा गारठा १० अंश पर्यंत खालावतो तेव्हा अतिदुर्गम भागात (अक्कलकुवा तालुक्यातील) तीन तेच चार अंशाने तापमान आणखी कमी असते, असे हवामान विभाग गृहित धरतो. यामुळे उद्या नंदुरबारला १० अंश तापमान राहिल्यास डाब परीसरातील तापमान पुन्हा ६ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची व दवबिंदू गोठण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि जंतूसंसर्गाला आणि आजारपण वाढवायला हे वातावरण आणखी पोषक ठरू शकते म्हणून रुग्णाईतांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!