नंदुरबार – भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात पार गोठवून टाकणारा गारवा निर्माण झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाब आणि अन्य परिसरात ईतका पारा घसरला आहे की, मागील चार दिवसांपासून रोज दवबिंदू गोठून बर्फ निर्माण झाल्याचे तिथे पाहायला मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अलिकडेच दि.9 व 10 जानेवारी 2022 रोजी वाहत्या गार वाऱ्यांमुळे गोठवून टाकणारे वातावरण बनले होते. अक्कलकुवा तालुक्यात 7 अंश व डाब परिसरात 3 अंश सेल्सियस पर्यंत तापमान घसरले होते. परिणामी तिथे दवबिंदू गोठले. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच धुळे जिल्ह्यातील गारपिटीमुळे दि. १० जानेवारी रोजी निच्चांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर डाब परिसरात तीन-चार अंश होते. यामुळेच त्या भागात घरांच्या छतांवर, वाहनांवर, अंगणात, पिकांवर बर्फाचा सडा पडलेला दिसला. आताही सलग चार दिवसांपासून डाब गावातील सर्व पाडे पुन्हा तोच अनुभव घेत आहेत. तेथील रहिवाशांनी सांगितले की, आम्ही रोज पहाटे दवबिंदूचे रूपांतर बर्फात झालेले पहात आहोत. शरीर गोठवणारी थंडी दिवसाही सतत जाणवते.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार असून हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मागील आठवड्यात वर्तवला होता. पालघर,नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची नोंद करीत उत्तर महाराष्ट्रात अवकाळीची शक्यताही वर्तवली होती. २३ ते २६ जानेवारी रोजी हवामान कोरडे राहिल परंतु तापमान घसरून थंडी वाढणार आहे. किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, असे हवामान विभागाने म्हटले होते. विद्यमान स्थितीत तो सर्व अंदाज खरा ठरल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे,जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सूर्य किरणांची ऊष्णता जाणवण्या ऐवजी वाहत्या हवेतील गारठा दैनंदिन जीवनावर परिणाम करीत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील किमान तापमान सोमवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 9.5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी असल्याची नोंद झाली. आज 25 जानेवारीरोजी देखील सायंकाळनंतर 9 अंश पर्यंत घसरले. दुर्गम व अतिदुर्गम भागात गोठवून टाकणारी हवा निर्माण झाली असून डाब परीसरात 4 अंशापर्यंत तापमान घसरलेले दिसले. जेव्हा नंदुरबारचा गारठा १० अंश पर्यंत खालावतो तेव्हा (अक्कलकुवा तालुक्यातील) अतिदुर्गम भागात तीन तेच चार अंशाने तापमान आणखी घसरलेले असते, असे हवामान विभाग गृहित धरतो. यामुळे नंदुरबारला 9.5 अंश तापमान असतांना डाब परीसरातील तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत झाले असावे. परिणामी त्या परिसरात दवबिंदू गोठले आहेत.
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषि हवामान केंद्राने कळविले आहे की, पुढील पाच दिवस जिल्ह्यात थंडी जास्त राहील तसेच हवामान कोरडे राहील. किमान तापमान ७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.३० जानेवारीपासून तापमानात घट होऊन थंडी कमी होण्याची शक्यता आहे. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस च्या पुढे गेल्यावर करावी. पपई व केळी यासारख्या पिकांना थंडीपासून संरक्षणासाठी प्लॅस्टिक बॅगचे आवरण लावाव पिकांना हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी. जनावरांचे व कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करावे.