नंदुरबार – शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात शेताच्या बांधावरील मोठमोठ्या ६ वृक्षांची कत्तल केली गेली आहे. तरीही मात्र वनविभागाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. शहादा तालुक्यात असे प्रकार सर्रासपणे घडू लागले आहेत प्रकाशा शहादा रस्त्यावरील तसेच खेतिया रस्त्यावरील अनेक वृक्षांची कत्तल झाल्याचे लोकांनी पाहिले आहे परंतु संबंधित अधिकारी अनभिज्ञ कसे काय असतात? याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
ही झाडे एका शेतकऱ्याच्या शेतातील आहेत. झाडे स्वत:चीच असल्याने ते कापण्यासाठी परवानगीची गरज नाही; असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. संबंधित वन अधिकारी दीपक जम्दाळे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे व त्यांनी अशी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात मोठमोठ्या वृक्षांची कत्तल होते, वृक्षतोड करून काढलेली मोठमोठाली लाकडे तेथून वाहून नेली जातात, मात्र वृक्ष कत्तली नंतरही वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कसे नसते; ही बाब संशयास्पद म्हटली जात आहे. एकीकडे शासन वृक्षारोपण करून संगोपन करण्यावर भर देत आहे तर दुसरीकडे वन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची कत्तल होत आहे ही बाब गंभीर असून वरिष्ठांनी यात त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.