नंदुरबार – एका शेतातील विहिरीत सुमारे 10 फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळून आला. यामुळे शेतातील मजूर आणि ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ ऊडाली. दरम्यान, अजगर पाहण्यासाठी ग्रामस्थांचीही मोठी झुंबड ऊडालेली पहायला मिळाली.
प्राप्त माहितीनुसार शहादा तालुक्यातील मानमोड्या येथील शेतकरी कैलास भिल यांचे गावालगत बागायत शेत आहे. त्या शेतातच ते निवास करून ते रहात आहेत. काल 25 जानेवारी रोजी दुपारी दोन-तीन वाजेच्या दरम्यान शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. त्यावेळी विहिरीतील पाण्यात हालचाल होत आहे व काहीतरी आवाज येत आहे असे त्यांना जाणवले. निरीक्षण केले असता त्यांना विहिरीतील पाण्यात मोठा अजगर तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेचच ग्रामस्थांकडे धाव घेतली.
त्या ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. वनक्षेत्रपाल आशुतोष मेहढे यांनी घटनास्थळी भेट दिली व सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्र स्वप्निल इंगळे, तन्मय बैसाने, गोकुळ ईशी यांनी सलग दोन तास प्रयत्न करून त्या दहा फुटी अजगराला सुरक्षित बाहेर काढून पकडले व वनक्षेत्रपाल आशुतोष मेहढे यांच्या मार्गदर्शनात अजगराला सातपुडाच्या जंगलात सुरक्षितपणे सोडले. वनक्षेत्रपाल आशुतोष मेहढे यांनी सर्पमित्र स्वप्निल इंगळे, तन्मय बैसाने व गोकुळ ईशी यांचे कौतुक केले.यावेळी अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी भली मोठी गर्दी केली होती.