नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वनविभागामार्फत अक्राणी तालुक्यातील निगदी गावात 5 हेक्टर क्षेत्रावर सीसीटी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने मनरेगा अंतर्गत विविध यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहे. त्यानुसार काकरदा वनक्षेत्रांतर्गत डोंगराळ भागात सीसीटी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. निगदी गावातील 39 अकुशल मजूरांना या कामामुळे रोजगार मिळाला आहे.
वनक्षेत्रपाल अभिजीत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटेचे काम 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 248 मनुष्यदिवस निर्माण झाले आहेत, तर कामावर 58 हजार रुपये खर्च झाला आहे. 10 मीटर लांब आणि दीड फूट रुंद सीसीटी तयार करण्यात येत असल्याने जलसंधारणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना काम देण्यासाठी प्रशासनाने गाव पातळीवर यंत्रणानिहाय कामांचे नियोजन केले असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांनी काम मिळविण्यासाठी गावातील ग्रामरोजगार सेवकांशी संपर्क साधावा,असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे यांनी केले आहे.
0000