प्रसिद्ध लेखक, पत्रकार, समाजसेवक डॉ. अनिल अवचट (77) ह्यांचे आज दिनांक २७/०१/२०२२ रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या दरम्यान दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी निधन झाले.
डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.
१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरेंचा समावेश आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.