आरक्षण जाहीर होताच साक्री, धडगावमधील नगराध्यक्षपदाच्या ‘या’ दावेदारांची नावं चर्चेत

नंदुरबार –  धडगाव-वडफळ्या नगर पंचायतच नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी राखीव झाल्यामुळे अनुसूचित जमाती राखीव जागेतून निवडून आलेल्या मान्यवरांचा अपेक्षाभंग झाला आहे. दरम्यान, साक्री नगरपंचायतीच्या व धडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची माळ नवख्या उमेदवारांच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील १३९ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण नगरविकास विभागाने गुरुवारी सोडतीद्वारे निश्चित केले. अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या १७ जागा असून त्यातील ९ जागा या अनुसूचित जाती (महिला) तर, ८ जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित आहेत. यापैकी खानदेशातील नगरपंचायतींपैकी साक्री अनुसूचित जमाती (महिला) राखीव, शेंदुर्णी व शिंदखेडा खुला प्रवर्ग (महिला) राखीव, तर बोदवड, धडगाव-वडफळ्या आणि  मुक्ताईनगर खुला प्रवर्ग (सर्वसाधारण) राखीव असे आरक्षण घोषित झाले आहे.
 हे आरक्षण घोषित होताच साक्री, धडगाव येथे आरक्षित पदाला पात्र विजयी उमेदवार कोण हे शोधून राजकीय बैठकांमध्ये फिल्डिंग लावण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. तर नगराध्यक्षपदासाठी आधीच फिल्डिंग लावून बसलेल्या अन्य काही जणांची आरक्षणामुळे दांडी उडाली आहे. धडगाव-वडफळ्या नगरपंचायतीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या काही सदस्यांचा असाच अपेक्षाभंग झाला आहे. आता नवख्या व्यक्तीला नगराध्यक्षपदी बसवून त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल, अशी भावना काही ज्येष्ठ सदस्यांच्या मनात येऊ लागली आहे.

धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी शिवसेना 13 जागांवर, काँग्रेस 3 तर भाजपा 1 जागेवर विजयी झाले. परिणामी शिवसेनेकडे निर्विवाद बहुमत आहे. येथील नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग (सर्वसाधारण) पुरुषासाठी राखीव निघाले आहे. या दृष्टीने पाहिल्यास येथे प्रभाग प्रभाग 13 मधून पावरा पुरुषोत्तम दिलवरसिंग आणि प्रभाग 15 मधून सुनंदाबाई हेमंत पावरा हे शिवसेनेचे विजयी ऊमेदवार सर्वसाधारण राखीव जागेवर निवडून आले असून हे नगराध्यक्षपदाचे दावेदार असू शकतील असे म्हटले जात आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते विजयसिंग पराडके, धनसिंग पावरा यांना यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम मोरे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला जाईल असे स्थानिक स्तरावर सांगण्यात आले आहे.

तर ईकडे साक्री नगरपंचायतमधेही आरक्षणामुळे पेच निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. साक्री नगरपंचायतीचे अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. भारतीय जनता पार्टीने शहरात 17 पैकी एकूण 11 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे साहजिकच सत्तेवर त्यांचा दावा आहे. या विजयी उमेदवारांपैकी दोन महिला आदिवासी जमाती प्रवर्गातील असून नगराध्यक्ष पदाच्या दावेदार ठरू शकतात. यात वार्ड क्रमांक 3 मधून भाजपाच्या उषाबाई अनिल पवार या 499 मते मिळवून तर वार्ड क्रमांक आठ मधून जयश्री हेमंत पवार या भाजपच्या उमेदवार 404 मते घेऊन विजयी झाले आहेत. तथापि निवडणूक वादातूनच निकालानंतर झालेल्या एका झटापटीत तरुणीचा मृत्यू झाल्याची व भाजपच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकासह काही लोकांवर गुन्हे दाखल होण्याची घटना घडली आहे. त्याचा नगराध्यक्ष निवडीवर काय परिणाम होईल ? याकडे सर्वांच लक्ष लागलेे आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते व शहराचे राजकारण पुढील काळात कोणते वळण घेते? याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!