मुंबई – भर रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी पेटते वाहन धावतानाचे अनेक प्रसंग आतापर्यंत आपण पाहिले आहेत. परंतु कधी पाहिला नाही असा पेटलेल्या धावत्या ट्रकचा हा लाईव्ह सीन पाहताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकला.
प्राप्त माहितीनुसार चाऱ्याने भरलेला एक ट्रक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वेगाने धावत असताना अचानक पेटला. ट्रकची मागील बाजू पूर्ण पेटून तिच्या भयानक ज्वाळा पसरू लागल्यावर इतर वाहनधारकांनी ओरडून सूचना करायला सुरुवात केली. चालकाला लक्षात आले तो पर्यंत मात्र बराच उशीर झाला होता. धु धु पेटलेला ट्रक थांबवणे देखील त्याला शक्य नव्हते. कारण त्यावेळी महामार्गावर धावणार्या वाहनांची गर्दी होती व अन्य वाहने पेटण्याचा संभव होता. म्हणून महामार्गावरून बाजूला मोकळ्या जागेत जायला मिळावे याची संधी शोधत ट्रकचालकाने पेटलेली ट्रक दामटणे सुरूच ठेवले. सुमारे चार किलोमीटर अशाच प्रकारे पेटलेला ट्रक धावला त्यानंतर मोकळे मैदान दिसताच त्या मैदानावर चालकाने ट्रक नेऊन उभा केला आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ट्रक सुरक्षित जागी नेऊन उभा करेपर्यंत दाखवलेले धैर्य खरोखर अतुलनीय आहे. हा सर्व प्रसंग काही वाहनधारकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपला असून त्याचे व्हिडिओ आता व्हायरल केले जात आहेत. काल दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी रात्री 8 वाजे दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यात विरार नजीक ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.