लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास सुनावली जन्मठेप

नंदुरबार – मौजे दुधाळे ता. जि. नंदुरबार येथील अवघ्या पंधरा वर्षे वयाच्या पिडीत अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा प्रमुख व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
    या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या न्यायालयात होवून आरोपी धिरज पाश्या पवार विरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने त्यास दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच रुपये ५,००० दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीतेची साक्ष महत्वाची ठरली. गुन्हयाचा सखोल व जलद तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पोसई कमलाकर चौधरी यांनी सादर केले होते. पिडीत मुलगी वय १५ वर्ष ही तिचे आईवडील व दोघे भावंडांसह मौजे दुधाळे ता. जि. नंदुरबार येथे राहणारी असुन ती लोकमान्य टिळक विदयालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याची पार्श्‍वभूमी अशी की दुधाळे गावातील धिरज पाशा पवार याची पिडीत मुलीशी ३ वर्षापासून ओळख होती. आरोपी धिरज हा विवाहीत असून त्याला ३ मुले देखील आहेत. असे असताना त्याने प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. तिच्या अज्ञानाचा फायदा घेत “मी माझ्या बायकोस सोडून तुझे सोबत लग्न करेल.” असे नेहमी सांगायचा. तिचा विश्वास बसल्याचा फायदा घेत त्याने तिचेवर ३ ते ४ वेळेस अत्याचार केला होता. दरम्यान, आरोपी धिरज पवार हा नाशिक येथे मजुरी कामानिमित्त निघुन गेला. काही दिवसांनी त्याने तिला मोटारसायकलने दुधाळे येथुन नाशिक येथे पळवून नेले. अज्ञानाचा फायदा घेत वेळोवेळी तिचेवर अत्याचार केला. एकूण प्रकार लक्षात आल्यावर पिडीत मुलीच्या आईवडीलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. म्हणून पोलीसांनी आरोपी धिरज पाश्या पवार व पिडीत मुलीस नंदुरबार येथे आणले व पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी धिरज पाशा पवार रा.दुधाळे ता.जि.नंदुरबार याचे विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे वर्ग-५, गुरनं-१५१/२०१९ भादविक, ३६३,३६६, ३७६ (३), पोक्सो ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अति सरकारी वकील अॅड. श्री. व्ही. सी. चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले आहेत व पैरवी अधिकारी म्हणुन पोना नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी पोसई कमलाकर चौधरी व अति सरकारी वकील अॅड. व्ही.सी. चव्हाण यांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पेंडीत व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!