प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनामध्ये हिंदु राष्ट्राची राज्यघटना बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ‘हिंदु राष्ट्र राज्यघटना’ असे नाव देण्यात येणार असून ही राज्यघटना पुढील वर्षीच्या माघ मेळ्यामध्ये संत आणि भाविक यांच्यासमोर सादर करण्यात येणार असल्याचे देखील या संमेलनात जाहीर करण्यात आले. हिंदू राष्ट्राची संकल्पना आणि हिंदू राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारुप तयार करण्याविषयी प्रथमच जाहीरपणे मांडणी करण्यात आली.
प्रयागराज येथील ब्रह्मर्षि आश्रमामध्ये माघ मेळ्यानिमित्त हे संत संमेलन चालू होते. यात शेकडोंच्या संख्येने साधू-संत सहभागी झाले होते. शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांचाही यात समावेश होता. या वेळी संतांनी ‘राज्यघटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे, असा प्रस्ताव संमत केला. दैनिक ‘सनातन प्रभात’ने हे वृत्त प्रकाशित केले असून त्यात म्हटल्याप्रमाणे संतांनी सांगितले, ‘संत संमेलनाचे लक्ष्य भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवणे आणि इस्लामी जिहादला दूर करणे हे आहे. देशातील १२५ कोटी जनतेने आता स्वतःच घोषित करावे की, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे.’ त्यांनी आजपासून असे दैनंदिन कामकाजात लिहिण्यास प्रारंभ करावा, तेव्हाच या मागणीचे आंदोलन देशभरात पोचेल आणि शेवटी सरकार संत अन् हिंदु जनता यांच्या समोर झुकेल.’
या वेळी काही संतांनी आरोप केला की, जिल्हा प्रशासनाने दूरभाष करून ‘संमेलनामध्ये जाऊ नये’. , असे सांगितले. तसेच प्रशासनाकडून काही अडथळेही निर्माण करण्यात आले. या संमेलनाचे नाव ‘धर्मसंसद’ ठेवण्यात आले होते; मात्र प्रशासनाने या नावाला आक्षेप घेत अनुमती देण्यास नकार दिल्याने याचे नाव ‘संत संमेलन’ असे ठेवण्यात आले, असे संतांकडून सांगण्यात आले.
अखिल भारतीय विद्वत् परिषदेचे सरचिटणीस डॉ. कामेश्वर उपाध्याय यांना राज्यघटनेच्या निर्मितीचे संयोजक बनवण्यात आले आहे. त्यांच्या अंतर्गत कायदेतज्ञ आणि सुरक्षातज्ञ यांचा समावेश असणाऱ्या ३ समित्या बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक समितीमध्ये २५ जणांचा समावेश असणार आहे. यांत शीख, बौद्ध, जैन यांच्यासहित १२७ पंथांच्या प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. श्रावण मासापर्यंत राज्यघटनेचे प्रारूप सिद्ध करण्याचे लक्ष्य आहे.
धर्मग्रंथांवर आधारित असेल हिंदु राष्ट्राची राज्यघटना !
हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने मध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे. यात ३ ते ८ वर्षे वयाची मुले आणि मुली यांना शिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर त्यांना अन्य शाळांमध्ये जाण्यास अनुमती असणार आहे. मुसलमानांना सन्मान आणि संरक्षण देण्यात येईल, असे संत संमेलन संचालन समितीचे संयोजक स्वामी आनंद स्वरूप यांनी स्पष्ट केले.
चंद्रगुप्त मौर्य यांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे असेल हिंदु राष्ट्रातील मंत्रीमंडळ!
स्वामी आनंद स्वरूप म्हणाले, भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. देशात लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात ‘धर्म खासदारा’ची निवड केली जाईल. या मतदारसंघातील उमेदवारांचे वय २५ वर्षांहून अधिक असेल, तसेच १६ व्या वर्षापासून मतदानाचा अधिकार असेल. नवी देहली येथील संसद भवनाप्रमाणेच काशी येथे संसद भवन बनवण्यात येईल. यासाठी काशीमधील शलूकंटेश्वरजवळ ४८ एकर जागा निवडण्यात आली आहे. हिंदु राष्ट्रात काशी हीच देशाची राजधानी बनवली जाईल. स्वामी आनंद स्वरूप पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रातील मंत्रीमंडळ चंद्रगुप्त मौर्य यांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे असणार आहे. यात संरक्षण, शिक्षण, राजकीय, आरोग्य आदी व्यवस्था असणार आहे.
भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र रचले जात आहे !
महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती यांनी सांगितले की, आम्हाला रोखण्यासाठी देशातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून षड्यंत्र रचले जात आहे; मात्र भारताला हिंदु राष्ट्र करण्याचे अभियान थांबणार नाही. हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आणि जिहाद नष्ट करण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत लढू. धर्मांतरित मुसलमानांना सन्मानपूर्वक हिंदु धर्मामध्ये आणले जाईल, तसेच मठ आणि मंदिरे यांना सरकारीकरणातून मुक्त करण्यात येईल. संमेलनामध्ये संतांनी ‘मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण रहित करावे आणि देशात धर्मांतरविरोधी काल कायदा करून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करावी’, असे प्रस्तावही संमत करण्यात आले. अटकेत असणारे यति नरसिंहानंद गिरि महाराज आणि जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना तात्काळ विनाअट मुक्त करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.