वसंतपंचमी एक विषेश महोत्सव
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
असे जीचे वर्णन वेदांमध्ये केलेले आहे तिचा जन्मदिन म्हणजेच वसंत पंचमी होय. सर्व ऋतूंचा राजा असणार्या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूलही याच दिनी लागते. हा दिवस श्रीलक्ष्मीदेवीचा जन्मदिनही मानला जातो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे वसंतपंचमी चे महत्व विशेष होय. हिंदू धर्मानुसार वसंत पंचमी हा उत्सव माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात. सरस्वतीदेवी या तिथीला उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा या दिवशी केली जाते.
सरस्वती देवीचे वर्णन व महात्म्य आपल्याला विविध पुराणात आढळून येते. ऋग्वेदातील १०/१२५ या सूक्तात सरस्वतीदेवीचा असीम प्रभाव आणि महिमा यांचे वर्णन आहे. विद्या आणि ज्ञान यांची अधिष्ठात्री देवता सरस्वती हिचा ज्यांच्या जिभेवर वास असतो, ते अतिशय विद्वान अन् कुशाग्र बुद्धीचे असतात.रूपमंडनमध्ये वाग्देवीचे शांत, सौम्य आणि शास्त्रोक्त असे वर्णन आढळते. देवीच्या रूपांमध्ये दुधाप्रमाणे शुभ्र रंगाच्या सरस्वती देवीच्या रूपाला अधिक महत्त्वाचे मानण्यात आले आहे. मत्स्य पुराणात सरस्वती देवीचे रूप आणि सौंदर्याचे वर्णन आढळून येते, तर वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडात सरस्वतीने आपल्या चातुर्याने देवांना राक्षस राज कुंभकर्णा पासून कसे वाचविले याचे वर्णन दिसून येते.
बिहार राज्यातील देव या गावी असलेल्या सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीला स्थापन झाल्यामुळे तेथील वसंतोत्सव ही विशेष असतो. या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रकट करणे आणि मौज करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे.
चला तर मग आजच्या दिनी विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा करून देवीतील गुणांची प्राप्ती करण्यासाठी व विद्या बुद्धी आणि ज्ञानाबरोबरच सदाचाराची प्राप्ती करून स्वतःतील अहंकाराला नष्ट करण्याचा संकल्प करूया व वैश्विक शांती व समृद्धीच्या दिशेने एक पाऊल उचलू या.
– डॉ०. प्रणिता महाजन, संभाजीनगर