नंदुरबार – मांजरे गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी वाढली आहे. तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत गावातील कालिका माता मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी केले.
जलजीवन मिशन अंतर्गत मांजरे ता. नंदुरबार येथे जलकुंभाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील यांनी केले.
यावेळी ॲड राम रघुवंशी म्हणाले, तापी नदीचे पाणी पंपिंगने जलकुंभात टाकण्यात येणार आहे. जलकुंभाने प्रत्येक ग्रामस्थांच्या नळाला पाणी येऊन सोय होणार आहे. ४३ हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले जलकुंभ ३ महिन्यात पूर्ण होईल.
ते पुढे म्हणाले, गावातील फरशीवर पाणी साचत असल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे बांधकाम अभियंत्यांकडून सर्व्हे करण्यात आला आहे. येत्या चार सहा महिन्यात गावातील रस्त्यांचे कामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक दीपक दिघे,सरपंच संजय राऊळ,उपसरपंच समाधान पाटील,सदस्य बळीराम पाटील, प्रकाश भिल,भारत पाटील,वसंत पाटील,नारायण पाटील,आनंदा पाटील,सदाशिव पाटील,दिलीप पाटील,रमेश पाटील, छोटू पाटील,दौलतसिंग राजपुत, दरबारसिंग गिरासे आदी उपस्थित होते.