
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून महिलांविषयीच्या चाललेल्या उपक्रमांचे तसेच कार्याचे जाहीरपणे विशेष कौतुक केले आहे. व्यक्तिगत इंस्टाग्रामवर एक दोन नव्हे तीन तीन पोस्ट द्वारे नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील भेटीची छायाचित्रे प्रसारित करून महिलांविषयीच्या कार्याबद्दल जाहीरपणे समाधान व्यक्त केले आहे. ही विशेष बाब मानली जात आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत काल दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी यांच्या उपस्थितीत नंदुरबार मध्ये जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर व सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षास भेट दिली. महिला संबंधी दाखल गुन्ह्यांचा तसेच जिल्हा पोलीस दलाकडून महिलांशी निगडीत कामकाजाचा आढावा घेतला. तसेच हरविलेल्या महिला व मुली यांच्या मिसिंग प्रकरणांचा आढावा घेतला. महिलांविरूध्द् दाखल गुन्ह्यात पोलीस दलाकडून तात्काळ करण्यात आलेली कारवाई तसेच मिसिंग महिला व मुली मिळून येण्याच्या प्रमाणाबद्दल रुपाली चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले. मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यातील अत्याचाराग्रस्त पिडीतेस तात्काळ लाभ मिळवून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार आदि उपस्थित होते.
महिलांविषयीच्या या विशेष कार्याची घेतली दखल
कायदेशीर कर्तव्या व्यतिरिक्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी कामाबद्दल श्रीमती रुपाली चाकणकर व सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी यांनी जिल्हा पोलीस दलाचा गौरव केला. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील माळी वाडा येथील विधवा महिला उज्वला चिंधा माळी यांना नाममात्र दरात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीचा गाळा उपलब्ध करून देण्यात आला. त्यात त्यांनी सुरु केलेल्या कल्याणी व्हेजिटेबल्स या दुकानाचे श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. फीत कापून झाल्यावर लगेचच अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर व अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः त्या महिलेच्या व्हेजिटेबल्स दुकानातून भाजीपाला खरेदी केला. त्यावेळी भाजीविक्रेत्याा महिलेच्या चेहऱ्यावर विशेष समाधान झळकत होते. नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव, मोलगी, शहादा येथील कौटुंबीक हिंसाचाराने ग्रस्त महिलांना जिल्हा स्तरावर येवून तक्रार देणे सोयीचे होत नसल्याने जिल्हा स्तरावर कार्यरत महिला सहायता कक्षाव्यतिरिक्त तालुका स्तरावर नंदुरबार जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यांमध्ये महिला सहायता कक्ष स्थापन करणेबाबत नियोजीत प्रस्तावाचे श्रीमती रुपाली चाकणकर यांनी कौतूक केले. त्यानूसार नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, नवापुर व शहादा येथील पोलीस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरु करण्यात येणार आहे. सुकाणू समिती, आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास विभाग, पुणे यांचेकडून परवानगी मिळताच सदरचे कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. सदर कक्षाकरीता नंदुरवार शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचे समुपदेशन केंद्र आगामी काळात सुरु करण्यात येणार आहे.
याप्रसंगी महिला सहाय्य कक्ष येथे समझोता झालेल्या पलक थारणी, गिता पाटील, सोनाली जावरे, अनिता कुंभार, रामी गावीत या कुटूंबाचा महिला आयोग अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच स्वबळावर व्यवसाय करणाऱ्या श्रध्दा भेलांडे, गायत्री कोळी, आरती चौधरी, गायत्री समाधान कोळी व कल्पना पाटील या महिलांचाही श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वबळावर व्यवसाय करणाऱ्या उज्वला माळी यांच्या भाजीपाला दुकानाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पोलीस विभागातर्फे महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. जिल्हा पोलीस दलातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनी देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलासारखे उपक्रम राबवावे अशी अशा व्यक्त केली.
त्याप्रसंगी नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, श्री. सचिन हिरे उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार, श्री. रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण, श्री. अर्जुन पटले, वाचक पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, श्री संदीप पाटील, सहा. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार, श्री. रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांचे मार्गदशनाखाली महिला सहायता कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, असई भगवान धात्रक, महिला पोलीस हवालदार/प्रमिला वळवी, प्रिती गावीत, महिला पोलीस शिपाई/ अरुणा मावची आदींनी केले.