टिपू सुलतान नव्हे छत्रपती शिवराय हेच खरे सम्राट ; अभाविपच्या प्रदेश अधिवेशनात डॉक्टर सोमण यांचे वक्तव्य

नंदुरबार – टिपू सुलतानचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरोखर मोठे साम्राज्य होते परंतु लिब्रांडूंनी बुद्धीभेद चालवत आपल्या पराक्रमाचा ईतिहास संकुचित केला; असे सांगत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर योगेश सोमण यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल नेटवर्कच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाचे विचार प्रसारित करण्यासाठी सिद्ध व्हा, ‘लिब्रांडू’ म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांच्या सोशल आक्रमणाला ठोस उत्तर देण्याच्या प्रयत्नांना अभियान बनवा. कारण, विचारांची लढाई पुढे आणखी तीव्र बनवणार आहे; असेही डॉक्टर सोमण म्हणाले.
नंदुरबार येथे अभाविप चे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन बाल हुतात्मा शिरिष कुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे. त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अधिवेशनाच्या उद्घाटनपर पहिल्या सत्रात डॉक्टर योगेश सोमण यांचे झणझणीत भाषण उपस्थित सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना खरोखरचा जोश भरणारे झाले. हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व; या प्रखर वाक्याने सुरुवात करताच सभागृह अत्यंत जोरदार घोषणांनी दणाणले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्या लिब्रांडू टोळीचा त्यांनी अत्यंत टोकदार शब्दात सभ्यपणे समाचार घेतला. बुद्धिभेद करीत आज पर्यंत राष्ट्रीयत्वावर बोलणाऱ्यांच्याविरोधात देशातील विद्यार्थी सैन्याला वापरले गेले. आता थेट प्रभावीपणे संपर्क करणाऱ्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे, असे सोमण म्हणाले. सोशलवर त्यांचे झुंड कार्यरत आहेत. तेव्हा राष्ट्रीयत्वाचा विचार प्रसार करणारी विद्यार्थी सेना सज्ज असली पाहिजे; असेही सोमण म्हणाले.
तत्पूर्वी अभाविप च्या  ५६ व्या  महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. हर्ष चौहान यांच्या हस्ते  दिप प्रज्वलन करून  प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेते श्री.योगेश सोमण, अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. आशिष चौहान, स्वागत समिती अध्यक्ष सौ. ईला गावित,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भय विसपुते, प्रदेश मंत्री श्री. अनिल ठोंबरे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी प्रदेश मंत्री कु. अंकिता पवार, शहर मंत्री जयेश सोनवणे उपस्थित होते. तर सभागृहातील प्रमुख रांगेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर कांतीलाल टाटीया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनाच्या  स्वागत समितीच्या  अध्यक्षा सौ. ईलाताई गावित यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी यांनी सर्वांसमोर विद्यार्थी परिषदेच्या कार्याची व्याप्ती सांगत समाजात उभारलेले प्रश्न, परिषदेने केलेला संघर्ष, त्यात येणाऱ्या अडचणी, मिळणारे अनुभव अशा विविध विषयांवर प्रा. सारंग जोशी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. आशिष चौहान यांनी विद्यार्थी परिषदेच्या आजतागायतच्या विविध कार्याचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. राजकीय भमिकांना नव्हे तर विद्यार्थी कॅम्पस निकोप पर्यावरणात वाढावे या दिशेने अभाविप सतत कार्यरत आहे, असे नमूद करून चौहान यांनी परिषदेचे विविध आयाम, मागील वर्षांत केलेल्या कार्यांचा अहवाल, आणि आगामी काळात करण्यात येणाऱ्या कार्यांवर आशिष चौहान यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 उद्घाटक राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. हर्ष चौहान यांनी त्यांचे विद्यार्थी परिषदेतील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.  आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी जनजाती बांधवांचा गौरवशाली इतिहास आणि नव्याने घोषित झालेल्या जनजाती गौरव दिनासाठी विद्यार्थी परिषदेने घेतलेला पुढाकार यासाठी अभिनंदन केले. विद्यार्थी कसा असावा याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना केले.
  उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन स्वागत समिती सचिव श्री. संतोष पाटील तसेच आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष डॉ. गिरीश महाजन यांनी केले.
त्या आधी दि. ११ फेब्रुवारीला सायंकाळी ध्वजारोहण करून या अधिवेशनाचा प्रारंभ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी आणि प्रदेश मंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच, २०२० -२०२१ या वर्षातील विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे दर्शन घडविणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी तंट्या भिल्ल प्रदर्शनीचे उद्घाटन नंदुरबार नगरपरिषदेच्या  प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. रत्ना भाभी रघुवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रदेशमंत्रीप्रतीवेदनात श्री. सिद्धेश्वर लटपटे यांनी वर्ष २०२०-२०२१ च्या  अभाविप च्या कार्याचे सिंहावलोकन केले. मंचावर प्रा.सारंग जोशी, अभाविप महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्री. अभिजीत पाटील उपस्थित होते.
 त्याचप्रमाणे ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२२ च्या प्रदेश अधिवेशनात अभाविप महाराष्ट्र प्रदेशाची पुनर्रचना करून, पश्चिम महाराष्ट्र प्रांत व देवगिरी प्रांत असे २  नविन प्रांत घोषित करण्यात आले. राष्ट्रपुनर्निमाणाच्या  कार्यात शिक्षण आणि विद्यार्थ्यांना आपल केंद्र मानून कार्य करत असलेल्या अभाविप ने यावर्षी केलेल्या विस्तारात्मक निर्णयात दोन प्रदेश अध्यक्ष तसेच दोन प्रदेश मंत्री अशा घोषणा केल्या. पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. निर्भय कुमार विसपुते तर प्रदेश मंत्री म्हणून श्री. अनिल ठोंबरे यांची निवड करण्यात आली. आणि देवगिरी  प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. सारंग जोशी व प्रदेश मंत्री म्हणून कु. अंकिता पवार यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!