मुम्बई – ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावरील जागतिक ऑनलाईन परिषद म्हणजे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे मोठे षड्यंत्रच आहे. हे पहाता, या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा, कार्यक्रमात सहभागी भारतीय वक्त्यांवर कारवाई करावी, तसेच देशभरातील जनतेने विरोध करण्यासाठी संघटित व्हावे; असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आयोजीत ‘हिंदुविरोधी प्रचाराचे वैश्विक षड्यंत्र’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात प्रमुख वक्त्यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी या माहितीत म्हटले आहे की,१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या विरोधात जगभरातून प्रतिक्रिया येत असून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. या कार्यक्रमाला भारतातून कम्युनिस्ट आणि साम्यवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते कविता कृष्णन, आनंद पटवर्धन, नलिनी सुंदर, नेहा दीक्षित, मीना कंदासामी आदी वक्ते संबोधित करणार असल्याचे, तसेच जगभरातील 40 हून अधिक विद्यापिठेही सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला होता; मात्र जगभरातील हिंदूंच्या जोरदार विरोधामुळे यातील अनेक विद्यापिठांनी ‘आमचा या कार्यक्रमाशी संबंध नाही’, असे घोषित करून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे हे मोठे षड्यंत्र पहाता, या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा, तसेच कार्यक्रमात सहभागी भारतीय वक्त्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जगभरातील हिंदूंनी आंदोलन केले. या विश्वव्यापी आंदोलनात 13 देशांतील, 23 राज्यांतील आणि 400 गावांतील हिंदूंनी सहभाग घेतला. तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून 44 ठिकाणी प्रत्यक्ष, तर 206 ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री श्री. जयशंकर यांना ‘ऑनलाइन’ निवेदने पाठवण्यात आली. यामध्ये हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील 32 हून अधिक हिंदुत्वनिष्ट संघटना आणि हिंदु धर्माभिमानी यांचा आंदोलनात सहभाग होता, असे समितीने कळविले आहे.
हिंदु जनजागृती समितीने या कार्यक्रमाद्वारे होत असलेले षड्यंत्र उघड करण्यासाठी ‘हिंदुविरोधी प्रचाराचे वैश्विक षड्यंत्र’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित केला होता. यामध्ये *इंग्लंड येथील हिंदु तत्त्वज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे अध्यापक पंडित सतिश शर्मा म्हणाले की,* पूर्वी ज्या ख्रिस्ती आणि कम्युनिस्ट यांनी जगभरात मोठ्या प्रमाणात नरसंहार केला. त्यांना आता भय वाटू लागले आहे की, आपला खरा इतिहास आता समोर येत आहे. युरोप आणि अमेरिकेत लोक आता योग, आयुर्वेद यांचे आचरण करत असून ते हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. म्हणूनच ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी परिषदेमधून हिंदु धर्माला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. त्यासाठीच अमेरिकेतील 9/11 हा दु:खाचा आणि आतंकवादाला विरोध असणारा दिवस त्यांनी परिषदेसाठी जाणीवपूर्वक निवडला आहे. या कालावधीत हिंदुविरोधी परिषद घेऊन त्यांना आतंकवाद आणि हिंदु धर्माला एकत्र जोडून जगभरात हिंदूद्वेष पसरवायचा आहे. हा त्यांचा अनेक वर्षांचा धंदा आहे. हिंदूंनी संघटित विरोध केल्यास ते यशस्वी होणार नाहीत आणि त्यांचा अनेक वर्षांचा धंदा संपेल.
*प्रसिद्ध लेखिका आणि ‘मानुषी’ मासिकाच्या संस्थापक-संपादक प्रा. मधु पूर्णिमा किश्वर या वेळी म्हणाल्या की,* भारताची उच्चतम पुरातन ज्ञानपरंपरा आणि त्या तुलनेत आपण मागे आहोत, असा पाश्चात्त्यांना पूर्वीपासूनच न्यूननंड होता. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंविरोधात घृणा पसरवली जात आहे. एकाला ‘गजवा-ए-हिंद’, तर दुसर्याला ‘रोम राज्य’ आणायचे आहे, हे आता लपून राहिलेले नाही. हिंदु धर्माला बदनाम करण्याच्या प्रयत्नाला विरोध केला पाहिजे. *सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील विचारवंत डॉ. यदु सिंग म्हणाले की,* हिंदु, हिंदु धर्म आणि हिंदुत्व हे काही वेगळे नसून एकच आहे; मात्र त्याची विभागणी करून हिंदुविरोधक हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण हिंदु धर्माला लक्ष्य करत आहेत. अमेरिकेतील परिषदेचे आयोजक हे हिंदु धर्माचा द्वेष करणारे असून अमेरिका आणि कॅनडा येथील विद्यापिठे याला पैसा पुरवत आहेत. हिंदूंनी आता खंबीर होऊन संघटीतपणे त्यांना वैचारिक स्तरावर विरोध करायला हवा.
*हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे या वेळी म्हणाले की,* वैश्विक स्तरावर आता हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, तसेच भारत सरकारनेही आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग करून हिंदुविरोधी कार्यक्रम रहित होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. *या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले की,* वैश्विक शक्ती हे जाणून आहेत की आचरण आणि तत्त्वज्ञान या आधारावर ‘हिंदुत्वा’ला आपण कधीच पराजित करू शकणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाला आतंकवादी, जातीयवादी, लैगिंक अत्याचारी वगैरे दाखवून कलंकित करण्याची जी खोटी योजना आखली आहे, ती म्हणजे अमेरिकेत होणारी हिंदुविरोधी परिषद होय ! , असे समितीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.