नंदुरबार – स्थानक अधिकारी-कर्मचरी प्लॅटफॉर्मवर उभे आणि मंडल रेल प्रबंधक आपल्या विशेष कोचमध्ये बसून बैठक घेताहेत, असे दृश्य नंदुरबार स्थानकावर सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पहायला मिळाले. सामान्य माणसांना ते दृश्य खटकले असते परंतु ब्रिटिश कालिन कर्मठ ‘साहेबी’ धाटणी तशीच जपून असलेल्या रेल्वे विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यात काहीच वावगे वाटले नाही.
या मागचे खरे कारण असे की, रेल्वेसेवा आणि सुविधा सुधारण्यात या मंडल रेल प्रबंधकांनी ज्या समर्पितभावाने शिस्तशीर ड्युटी बजावणे सुरू ठेवले आहे, ती कार्यपद्धती त्या सगळ्यांनाच प्रभावित करून गेली आहे. या मुंबई मंडल रेल प्रबंधकांचे नाव आहे जी.व्ही. एल सत्यप्रकाश. अचानक भेटी देऊन तपासणी करण्याच्या आणि रेल्वे सेवेतील कोणत्याही त्रुटी समस्येचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवून निराकरण करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे मुंबई मंडल रेल प्रबंधक जी व्ही एल सत्यप्रकाश हे सध्या चर्चेत आले आहेत. जी व्ही एल सत्यप्रकाश हे असे पहिले मंडल रेल प्रबंधक आहेत की, जे सुरत पासून जळगाव पर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांना स्वतः भेटी देऊन नियमित पाहणी करत असतात. मुंबईतून ऊठून तपासणीसाठी आवर्जून महिन्यातून किमान एक-दोनदा नंदुरबार सारख्या स्थानकाला भेट देणे त्यांचे ठरलेले असते. साहेब केव्हा येतील आणि काय विचारतील, हा धाक येथे निर्माण झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच नंदुरबार स्थानकावर गांधीधाम एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारला आग लागणाची घटना घडली तेव्हा सर्वांना त्यांचा तडफदारपणा पाहायला मिळाला. ती घटना कळताच सत्यप्रकाश हे विशेष कोचमधून धावत आले व पथका समवेत चौकशी केली होती आणि नंतर त्यासंबंधी गुन्हा देखील तातडीने दाखल झाला होता.
त्यांच्या कामाचा झपाटा असा की, मुंबईहून नंदरबारला सोमवारी पहाटे 4 वाजता पोहोचले. लगेच 8 वाजता नंदुरबार स्थानकावरील संबंधितांची बैठक घेत आढावे घेतले. त्वरित काम निपटून धावता यावे म्हणून कोचमधे बसूनच हे सर्व पार पाडले व आपली रेलगाडी पुढे दामटली. न थांबता त्वरीत पाळधीला गेले. दिवसभर पाहणी करणे, आढावा घेणे पार पाडून लगबगीने रात्री 8.30 वाजता नंदुरबार स्थानकात परत आले. सर्व स्टाफला मिटिंग हॉलमधे बसवून रात्री 11.30 पर्यंत माहिती, आढावे घेण्याचे काम पार पाडले. रेल्वे च्या कार्मिक अभियांत्रिकी यांत्रिक अशा कोणत्याही विभागाशी संबंधित समस्या अथवा त्रुटी अथवा तक्रारी असतील तर ऑनलाइन त्वरित माहित करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ॲपचे वैशिष्ट्य असे की, त्यावर मांडलेली समस्या, तक्रार ज्या विभागाशी संबंधित आहे त्याच विभाग प्रमुखाकडे पोहोचते व बंधनकारक केले असल्यामुळे त्वरित त्याचे निराकरण केले जाते. याचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना त्यांनी याप्रसंगी नंदुरबार स्थानकातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना केली. राष्ट्रहित हेच सर्वतोपरी असल्याचे मानून प्रत्येक सेवा काटेकोरपणे द्या; असेही त्यांनी बजावले. यानंतर विश्रांती घेऊन मंगळवारी सकाळी सुरतच्या पाहणी दौऱ्याला रवाना झाले. अर्थातच त्यांच्यासोबतच्या अधिकारी पथकालासुद्धा याच पद्धतीने धावपळ करावी लागली.
एरवी मंडल रेल प्रबंधक (म्हणजे डी.आर.एम.) पदावरील व्यक्ती केव्हा येतात, केव्हा जातात आणि बदली होऊन कोण आले आणि कोण गेले, हे सामान्य लोकांना कळणे तर दूर रेल्वे स्थानकावरील अनेक कर्मचाऱ्यांनासुद्धा माहीत नसायचे. हा मागील अनेक वर्षांचा सार्वत्रिक अनुभव आहे. परंतु आता ‘देश बदल रहा हैं’ या वाक्याची थोडी थोडी अनुभूती देणारी जी.व्ही.एल. सत्यप्रकाश यांची कार्यपद्धती रेल्वे कर्मचाऱ्यांना अपवाद वाटू लागली आहे. रेल्वे सल्लागार समिती वरील सदस्यांच्या माध्यमातून मांडली जाणारी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यावर उपाय देखील करतात, हा त्या प्रतिनिधींचा अनुभव आहे.
गजाळी ओंगळ वाटणारे नंदुरबार रेल्वे स्थानक अलीकडे ऑल टाईम अत्यंत स्वच्छ चकचकीत दिसते. प्लॅटफॉर्मवर कुठेही थुंकणारे, गुळणी अथवा कचरा टाकणारे प्रत्येकाला दंड आकारला जातो. प्लॅटफॉर्म वरचे विक्रेते पोषाखात दिसतात. हे सर्व बदल सत्यप्रकाश यांनी लावलेल्या शिस्तीचा परिणाम असल्याचे स्थानक अधिकारी म्हणतात.