नंदुरबार – जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना हेल्मेट वापरणे आज पासून सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट विना आढळल्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईलच शिवाय अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विरुध्द शिस्तभंग कारवाई देखील करण्यात येणार आहे. यामुळे आज अनेक पोलिस कर्मचारी लगबगीने हेल्मेट खरेदी करताना दिसले.
दरम्यान आधी पोलीस दलाला हेल्मेट वापरणे सक्तीचे करून जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. चांगले बदल करण्यास इतरांना सांगण्याआधी घरातूनच सुरुवात करावी, असे म्हटले जाते. तोच विचार त्यांनी अमलात आणला, हे ऊत्तमच झाले, अशा प्रतिक्रिया नागरिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातून व नियुक्तीच्या ग्रामीण ठिकाणावरून पोलीस अधीक्षक कार्यालयात व पोलीस मुख्यालयात कामानिमित्त दुचाकी वाहनाने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरता हा आदेश असल्याचे म्हटले जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, यापुढे जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आवारात हेल्मेट परीधान करणे सक्तीचे करण्यात येत आहे. तरी दि. १९/०२/२०२२ रोजी पासून कोणीही पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे बिना हेल्मेट पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय आवारात प्रवेश करणार नाहीत. विना हेल्मेट दुचाकी चालवितांना पोलीस अधिक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय नंदुरबार आवारात आढळून आल्यास पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, नंदुरबार यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडुन मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, असेे जिल्हा अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आदेशीत केले आहे.
दरम्यान, आज पोलीस दलात लागू झालेली हेल्मेट सक्ती उद्या नजीकच्या काळात सामान्य जनतेलाही लागू केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.