‘गुरु’ ग्रहाच्या अस्त काळात काय करावे? काय करू नये?

23 फेब्रुवारी 2022 पासून गुरु ग्रहाचा अस्त आहे. या कालावधीत कोणती कार्ये करावीत ? आणि कोण करू नये ? याविषयी मोठे संभ्रम असतात व अस्त काळात शुभ कार्य करू नयेत, असेही सरसकट सांगितलेे जात असते. परंतु यावर शास्त्र काय सांगते ? हे जाणून घेणे आवश्यक आहे.
यावर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून 20 मार्च 2022 पर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. प्रत्येक वर्षी सूर्याच्या सान्निध्यामुळे मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात (मावळतात). त्यामध्ये धर्मशास्त्राने आणि मुहूर्त शास्त्रकारांनी गुरु अन् शुक्र यांच्या अस्तंगत कालावधीस विशेष महत्त्व दिले आहे. ‘गुरु किंवा शुक्र ग्रहाचा अस्त होण्यापूर्वी ३ दिवस (वार्ध्यदिन), त्यांचा उदय झाल्यानंतरचे ३ दिवस (बाल्यदिन) अन् अस्तंगत कालावधी मंगल कार्यासाठी आणि अनेक प्रकारच्या धार्मिक कृत्यांसाठी वर्ज्य करावा’, असे धर्मशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे. प्रामुख्याने मुंज, विवाह, यज्ञयागादी कृत्ये, देवप्रतिष्ठा, वास्तुशांती, भूमीपूजन, शांती कर्मे, काम्यकर्माचा आरंभ आणि समाप्ती, व्रतग्रहण, उद्यापन, नूतन उपाकर्म इत्यादी कर्मे करू नयेत; मात्र ‘गुरु किंवा शुक्र या दोन ग्रहांपैकी केवळ एकाचा अस्त असतांना अडचणीच्या प्रसंगी मंगल कार्य करता येईल’, असे ‘मुहूर्तसिंधु’ या ग्रंथामध्ये दिलेले आहे. त्याचा आधार घेऊन सध्याच्या काळात मंगल कार्य करता येईल. गंगा, गया आणि गोदावरी या तीर्थक्षेत्री नारायण-नागबली, त्रिपिंडी यांसारखी कर्मे करता येतील. गुरु किंवा शुक्र यांचा अस्त असतांना नित्य, नैमित्तिक कर्मे करता येतात, उदा. नवरात्रीमध्ये प्रतिवर्षी केली जाणारी नवचंडीसारखी यागादी कर्मे, तसेच देवतांची पुनर्प्रतिष्ठा, पर्जन्ययाग करता येईल; कारण अगतिक कर्मे (जी कर्मे त्याच वेळी करणे आवश्यक आहेत, अशी कर्मे) अस्तकाळात करावीत; मात्र
सगतिक कर्मे, म्हणजे जी कर्मे पुढे, म्हणजे नंतर करता येतात, ती कर्मे अस्तकाल संपल्यावर करावीत, उदा. ६०, ७०, ७५, ८१ वर्षे वयाच्या शांती, सहस्रचंद्रदर्शन यांसारखी शांती कर्मे सगतिक असल्याने अशी कर्मे अस्तकाळ संपल्यावर करावीत.
विवाहनिश्चय, साखरपुडा, डोहाळेजेवण, जावळ, नवीन घरामध्ये (वास्तुशांती न करता) लौकिक गृहप्रवेश करून रहावयास जाणे, नामकरण (बारसे), अन्नप्राशन, गोंधळ, बोडण अशा (साभार : दाते पंचांग) प्रकारची शुभ कर्मे, तसेच जागा, भूमी, घर (फ्लॅट), वाहन यांची खरेदी; व्यापार, दुकान, व्यवसाय यांचा शुभारंभ, शेतीविषयीची सर्व कामे; उपनयन, विवाह यांची अंगभूत कर्मे (नांदीश्राद्ध, ग्रहमख, देवब्राह्मण इत्यादी) अस्तकाळात करता येतात.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा येथील ज्योतिष फलित विशारद  सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी ही माहिती ‘सनातन प्रभात’ या दैनिकातून दिली आहे. सौ. प्राजक्ता संजय जोशी या वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) आहेत.
(वाचकांची जिज्ञासा आणि उत्सुकता लक्षात घेऊन हा मजकूर येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे. श्रद्धा अथवा अंधश्रद्धा यांच्या अनुषंगाने कोणताही समज दृढ करण्याचा हेतू नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!