मोठ्ठा निर्णय! पोलिस हवालदारांचे उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकारणारा निर्णय निर्गमित

नंदुरबार – राज्यातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गातील ३८ हजार १६९ पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. राज्यातील हजारो पोलीस हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे येथील जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे, या दृष्टीकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता. या निर्णायाला आज मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
 या पुनर्रचनेनंतर पोलिस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलिस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे १७ हजार ७१,  इतकी वाढतील. परिणामी पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण निश्चितपणे कमी होईल असाही विश्वास गृहमंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. हे वृत्त प्रसारित होताच नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील अनेक ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!