मुंबई – आधी कोरोनाव्हायरस, मग डेल्टा आणि नंतर ओमिक्रॉनने धुमाकूळ घातल्याने सर्व त्रासले आहेत. शिवाय कोरोना संपला असं वाटत असतानाच त्याचे निरनिराळे परिणामही समोर येत असतात. आता संशोधन करणाऱ्या एका अभ्यासक गटाने कोरोनामुळे माणसांच्या प्रजनन क्षमतांवर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. भारतात मात्र अशा कोणत्याही परिणामांविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही अथवा दुजोरा देण्यात आलेला नाही.
हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका गटाने अलीकडेच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, कोविडची लागण अंडकोषांना इजा करू शकते, लैंगिक इच्छा कमी करू शकते आणि पुरुषांमधील प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते. हा अभ्यास कोरोनाव्हायरसने संक्रमित हॅम्पस्टरमधील टेस्टिक्युलर आणि इतर हार्मोनल बदलांवर आधारित होता. काही बड्या वृत्तवाहिन्यांनी साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्ताचा हवाला दिला आहे. त्यानुसार, एचकेयू (हाँग काँग युनिव्हर्सिटी)मधील प्रोफेसर युएन क्वोक युंग आणि त्यांच्या टीमने या अभ्यासाचे नेतृत्व केले.
या वृत्ताचा हवाला देऊन पुढे म्हटले आहे की, ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्हीमुळे अशी गुंतागुंत होऊ शकते, असेही त्यात म्हटले आहे. हा विषाणू लैंगिक इच्छा तसेच पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी करू शकतो.” संशोधकांनी असा दावाही केला आहे की हे बदल – अध:पतन, जळजळ. तसेच टेस्टिक्युलर टिश्यूचा मृत्यू – संसर्ग झाल्यानंतर 7 दिवस ते 4 महिन्यांच्या आत दिसून आले. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही प्रकारांमुळे हे बदल होऊ शकतात. तथापि, लसीकरणाने अशा गुंतागुंत टाळता येऊ शकतात.