नंदुरबार – शेती कामासाठी रात्री ऐवजी दिवसा शेतीकामासाठी १० ते १२ तास विज पुरवठा मिळावा, या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष नथ्यु पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष ईश्वर चौधरी यांच्या नेतृत्वात आज रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज महावितरण कंपनीविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
समशेरपुर फाट्यावर हा रास्ता रोको करण्यात आला. अधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. संघटनेकडून दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, समस्त शेतकऱ्यांना शेती कामासाठी रात्री ऐवजी दिवसा शेतीकामासाठी १० ते १२ तास विज पुरवठा मिळावा, या मागणीसाठी मागील 8 ते 10 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षते खाली वीज वितरणच्या विरोधात आंदोलन करणे सुरू आहे. पण राज्य सरकार व वीज वितरण कंपनीचे संबंधीत अधिकारी काहीही हालचाल करण्यास तयार नाही. म्हणून आज दि. 4 मार्च 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्यावतीने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात प्रत्येक तालुका पाळीवर रास्तारोको आंदोलन केले. नंदुरबार तालुक्यात समशेरपूर फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नथ्यु पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष ईश्वर चौधरी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.