समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री
पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण
तिसरे ते सावधपण | सर्व विषयी ||
ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत असतांना त्यातील काही निवडक ओव्या विचाराला प्रवृत्त करतात.अकराव्या दशकातील पाचव्या समासातील या काही ओव्या प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आत्मसात केल्या तर सध्या एकूणच धर्मकारण, राष्ट्रकारण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या मानवी जीवनातील महत्वपूर्ण अंग असलेल्या पाच क्षेत्रातील दूरवस्थेला दुरूस्त करून सुव्यवस्था निर्माण करता येईल असे सखोल अभ्यास व चिंतन केल्यावर प्रकर्षाने जाणवते.दासनवमीच्या निमित्ताने समर्थांनीच दिलेले हे पाथेय आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी ही अल्पसेवा समर्थचरणी अर्पण करतो.
ग्रंथराज दासबोधातील सर्वच विचार हे समर्थांनी केलेल्या कठोर तपाची व मूलगामी चिंतनाची अभिव्यक्ती आहे.देश काल परिस्थितीच्या मापदंडात हे विचार बसवून चालणार नाहीत.एक प्रदीर्घ दूरगामी चिंतन त्यातील प्रत्येक शब्दातून व्यक्त होते म्हणून त्यातील प्रत्येक शब्दाला मंत्राचे सामर्थ्य आहे.त्यातील प्रत्येक शब्दावर निरूपण करता येईल एवढा गहन अर्थ त्यात भरलेला आहे.सद्यस्थितीत उपरोक्त ओवीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया.
राजकीय भाषेत बोलायचे झाले तर राज्यकर्ते,नेतेगण, कार्यकर्ते व सामान्य नागरिक या सर्वांनीच यावर विचार करून आचरण करण्याची गरज आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण -समर्थांनी असे सांगून आपल्या मनाला खूप मोठा संदेश दिला आहे.कोणताही विचार, आचार, व्यवहार करताना आपल्याला एक अध्यात्मिक बैठक असणे महत्त्वाचे आहे तरच आपल्याकडून योग्य विचार, योग्य आचार आणि योग्य व्यवहार घडतो. त्यासाठी हरिकथा निरूपण हे पहिले हवे असे ते आग्रहाने सांगतात.दासबोधात एका ठिकाणी समर्थांनी
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ||
असे आग्रही प्रतिपादन केले आहे.याचा स्पष्ट अर्थ असा की, कोणताही कार्यारंभ करतांना भगवंताचे स्मरण निरूपण आवश्यक आहे.तरच तो त्या कार्याचा श्रीगणेशा ठरतो.हे मूलगामी , दूरगामी चिंतन आजच्या स्थितीततही तंतोतंत लागू आहे.भगवंताचे अस्तित्वच नाकारणारा एक विचार प्रवाह समाजात निर्माण होवू पाहतो आहे.त्याला पुरोगामी म्हणण्याचा एक प्रघात आपल्याकडे आहे . दुर्दैवाने त्यालाच प्रगत म्हंटले जाते आहे.पण असल्या शक्तींना रोखण्यासाठी समर्थांचे हे मार्गदर्शन फार मोलाचे ठरेल.ते मनात साठवून ठेवले पाहिजे.हरिकथा निरूपणावर विश्वास ठेवणारी भगवद् भक्तांची मांदियाळी वाढवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.यालाच धर्मकारण असेही म्हणता येईल.व्यक्तिगत व सामुहिक स्वरूपात भगवंताचे स्मरण , निरूपण करणे याला प्रथम प्राधान्य समर्थ देतात.
दुसरे ते राजकारण – असे प्रतिपादन करतांना समर्थांनी दुसरे महत्त्वाचे स्थान राजकारणाला दिले आहे कारण समाजव्यवस्था सुचारू रूपात चालायची असेल तर कांहीं नियम दंडशक्तीच्या रूपाने तयार करून समाज नियंत्रित करणे आवश्यक आहे.हे नियंत्रण करणारा तो राजा किंवा राज्यकर्ता ही व्यवस्था म्हणजे राजकारण.हरिकथा निरूपणातून एक अध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त केलेला राजा हे सर्व नियंत्रण करेल हे समर्थांना अभिप्रेत आहे.पण सद्यःस्थितीत निधर्मी राजकारणाचा बोलबाला अधिक दिसून येत असल्याने तुमच्या माझ्यासारखे सामान्य नागरिक संभ्रमित होतात .त्याचाच परिणाम म्हणून राजकारण हे दिशाहीन बनत चाललंय ही वस्तुस्थिती आहे.देव ,धर्म,देश या सर्वांनाच आपल्या सोयीनुसार वापरणं म्हणजे राजकारण असा चुकीचा अर्थ लावून समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तत्वज्ञ, आध्यात्मिक शासक असण्याची नितांत गरज आहे. प्रखर राष्ट्रवादाची बीजं त्यात पेरली आहेत. म्हणून राजकारणाकडे त्या डोळस दृष्टीकोनातून पाहणं ही आमची जबाबदारी आहे.असा समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होणं ही काळाची गरज आहे.राष्ट्रकारणातून राजकारण घडावे यासाठी राजकारण आपला विषय नाही.आपल्याला त्यातलं काही कळत नाही असं म्हणण्यात शहाणपण नाही.हे समाजात रूढ करण्यासाठीच समर्थांनी राजकारणाला दुसरें स्थान दिले आहे.
तिसरे ते सावधपण- हा अत्यंत समर्पक असा संदेश समाजाला म्हणजे आपल्याला समर्थ देतात. धर्मकारण, राष्ट्रकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण ही पाचही क्षेत्र योग्य रितीने उभी रहावीत ही समर्थांची तळमळ होती.त्यासाठी धडपडणारे आपण सर्वच आहोत.आज समाजजीवनातील ही सर्व अंग विस्कळीत झाल्याचा अनुभव आपण घेत आहोत.
धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही, राजद्रोही, समाजद्रोही, अर्थद्रोही या नवीन जमातींचा हैदोस सर्वत्र सुरू आहे . याचं प्रमुख कारण आमच्यातला बेसावधपणा हेच आहे.म्हणूनच अधर्म, देशविरोधी कारवाया, राजकीय स्वार्थ,अनिती, अन्याय ,जात्यंधता, भ्रष्टाचार या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत.यातून बाहेर पडण्यासाठी समर्थांचा हा तिसरा संदेश देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
या तीनही महत्त्वपूर्ण अशा उपदेशानंतर समर्थ ‘ सर्व विषयी ‘ असे मार्मिक व सूचक असे भाष्य करतात . याचा अर्थ सर्वांना सर्व विषयांत सर्वत्र सावधानता बाळगावी लागेल.तरच सर्व क्षेत्र योग्य रितीने उभी राहतील.आज आपण सर्वत्र हाच अनुभव घेत आहोत. त्यामुळे सद्यःस्थितीत समाजाची मानसिकता “भग्न मन है, त्रस्त तन है तिक्त जन हुआ ” अशी झालेली आहे. अशावेळी समर्थांनी सांगितलेल्या या समासातील आणखी एका ओवीचा आधार आपल्याला मिळतो तो म्हणजे ” चौथा तो अत्यंत साक्षेप फेडावे नाना आक्षेप ” अशा स्थितीत आळस झटकून सक्रिय होणे आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर करणे हे काम करण्याचे दायित्व ते आपल्यालाच देतात हे लक्षात घेऊन आजच्या काळात आपण कटिबद्ध होवू या हाच संदेश ही दासनवमी आपल्याला देत आहे.
धन्यवाद 🙏🏼
– शशिकांत घासकडबी, नंदुरबार
(९५२७१५३९२५)