शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार करावे-ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.14: जिल्ह्यात शाळेतील वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार व्हावे याबाबत विशेष दक्षता घ्यावी. कामाचा दर्जा चांगला रहावा यासाठी ही कामे स्वतंत्र संस्थेमार्फत करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यातील वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाला गती देण्यात यावी. अंगणवाडीमध्ये विद्युत आणि नळजोडणीची व्यवस्था करण्यात यावी. आवश्यक असेल तिथे सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

नवापूर येथील 132 केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाबाबत त्वरित कार्यवाही करावी. अक्कलकुवा येथेदेखील अशा उपकेंद्राच्या आवश्यकतेबाबत पाहणी करून प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आदिवासी युवकांना उपयुक्त असलेले अभ्यासक्रम घेण्यात यावे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थाना रोजगार मिळायला हवा असे त्यांनी सांगितले.

बैठकीत आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम, पर्यटन व यात्रास्थळ परिसरातील सुविधा, वाडीपाड्यावरील विद्युत जोडणी, नर्मदा किनाऱ्यावरील गावांना पाण्याची सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत झालेल्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला.

जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण योजनेत 130 कोटी रुपये मंजूर नियतव्यय असून 6 कोटी 36 लक्ष आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर 297 कोटी 6 लक्ष नियतव्ययापैकी 9 कोटी 10 लक्ष खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 11 कोटी 73 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीत पीक परिस्थितीवर चर्चा.

जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना कमी पाण्यात घेता येणाऱ्या भगरसारखे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पात उपलब्ध पाणी लक्षात घेऊन पुढील कालावधीसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कालावधी वाढविण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी गिर्यारोहक अनिल वसावे याचा माउंट एलब्रूस शिखर सर केल्याबद्दल खासदार डॉ.गावीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!