दुर्दैवाने ‘आई’तली संस्काराची गंगोत्री आटलीय का?

दुर्दैवाने ‘आई’तली संस्काराची गंगोत्री आटलीय का?
अस्वच्छ पाणी स्वच्छ (साफ) करण्याचे काम तुरटी, तर मळलेले कपडे स्वच्छ करण्याचे काम साबण करतो ; पण तुरटीचं पाणी आणि साबणच कपडे घाण करत असेल, तर मग पाण्याला अन कपड्यांना स्वच्छ करणार कोण ? घर हे एक संस्कार केंद्र असते आणि त्यातील मुलांवर सुसंस्कार करण्याचे सर्वांधिक दायित्व आईवर असते. पण संस्कार केंद्र म्हणवणारी घरे आणि ही आईच भारतीय संस्कृती, संस्कार, जीवनमूल्य विसरत चालली असेल, तर ?.. त्या घरावर, घरातील मुलांवर सुसंस्कार करणार कोण ? दुर्दैवाने आज मुलांवर मूलभू्त सुसंस्कार करणारी ‘घर’ नावाची पहिली संस्कारकेंद्रे उद्ध्वस्त होत चालली आहेत. आता काही मोजकी घरे सोडल्यास बाकी बहुतांश घरांत मुलांवर देव, धर्म आणि राष्ट्र यांचे संस्कार करणारी तेजस्वी अन् कणखर आई उरलीच नाही. ती आता आधुनिक ‘मम्मी’ झाली आहे. आधुनिक वर्तनात आपले मूळ विसरत आहे. ती स्वतःच गाऊन घालून मुलाला मातृभाषेऐवजी परकीय इंग्रजी भाषा शिकवण्यात, त्याला भारतीय आहाराऐवजी पिझ्झा, बर्गर, मॅगी, पाव, बिस्किट खाऊ घालण्यात धन्यता मानू लागली आहे. ‘करीअर’च्या नादात अनेकींना घरातले घरपण राखणे डोईजड झाले आहे. मुलांना ‘शुभम् करोती’, ‘रामरक्षा’ शिकवण्याऐवजी स्वतःच दूरदर्शनवरील फालतू मालिका पहाण्यात, गप्पा, पार्ट्या यात रममाण होऊ लागली आहे. मुलांच्या हातात संस्कारक्षम गोष्टीचे पुस्तक देण्याऐवजी दूरदर्शनचा रिमोट, संगणकाचा माऊस किंवा भ्रमणभाष देऊ लागली आहे. कारण ‘आई’ बनणे अवघड असते, ‘मम्मी’ बनणे मात्र सोपे असते.
आईवरच संस्कार होत नाहीत, ती मुलांवर काय संस्कार करणार ? एक आई सुशिक्षित आणि सुसंस्कारित झाली की, सारे घर सुशिक्षित आणि सुसंस्कारित होत असते. त्या उलट एक ‘आई’ बिघडली की, सारे घरही बिघडत असते. त्याचे दाखले आपल्या भोवताली दिसत आहेत जसे की आज समाजात ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. आपल्या सहस्रो मुली परधर्मातील युवकांसमवेत घरून पळून जात आहेत. याला मुख्यतः आपली उध्वस्त होत चाललेली घर नावाची संस्कार केंद्रे, त्यात रहाणारे आई-वडील उत्तरदायी आहेत. कित्येक ठिकाणी आवश्यक नसतांनाही केवळ हौसेखातर, अधिक पैसा आणि अधिक चैन (ऐश) यासाठी स्त्रिया चाकरी (नोकरी) करतांना दिसतात. त्यामुळे आई-वडील दिवसभर बाहेर, आजी-आजोबा नकोसे झालेले आणि सुसज्ज असणार्‍या घरात मुले-मुली मात्र एकटी. त्यांना ठरवून जाळयात कोणी ओढतंय याची जाणीव नव्या वळणाच्या आईला होतच नाही. कारण ‘आजची जीवनशैली’ असं म्हणत तिच डोळ्यावर कातडी ओढते. मग अशा घरांमध्ये मुले-मुली मात्र मित्रासमवेत काय करतात, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल यावर काय पहातात, काय बोलतात यावर नियंत्रण अथवा बंधन कोण ठेवणार ? सायंकाळी आई-वडील थकून घरी येणार, अशा परिस्थितीत ते मुलांना आपला वेळ काय देणार ?…. महिला दिवस साजरा करताना यावर विचार मंथन झाले पाहिजे.
– सुवर्णा साळुंखे, जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!