पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दुर्गामातेचे चित्र रेखाटून जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा !

नंदुरबार – जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दुर्गामातेचे अतिशय सुंदर चित्र रेखाटून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिनांक 8 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विविध संस्था संघटना आणि शासकीय कार्यालयांमधून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्त्री शक्तीचा सन्मान आदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जागृती आणि प्रबोधन त्यामाध्यमातून घडवले जाते. नंदुरबार जिल्ह्यात देखील आज अत्यंत उत्साहात महिला दिवस साजरा होत आहे. मिरवणुका, विशेष कार्य करणाऱ्या महिलांचे सत्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.

दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी अत्यंत सुबक सुंदर असे दुर्गा देवीचे चित्र रेखाटून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्त्री म्हणजे आदिशक्ती असे मानले जाते. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीतत्त्व देवी शक्ती कार्यरत असते आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे; या विचारांची आठवण जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी या चित्राच्या माध्यमातून करून दिली आहे. कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील हे छंद म्हणून सुंदर चित्र काढत असतात. याआधी देखील ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलिपकुमार यांचे रेखा चित्र रेखाटून आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली होती. प्रसंग वैशिष्ट्य हेरून रेखाचित्र बनविणे त्यांची हातोटी आहे. हुकमी व सुबक, वळणदार रेखांकन त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते. खाकी वर्दीतील त्यांच्यातला कलाप्रेमी अधिकारी नंदुरबार वासियांना सुखद धक्का देऊन गेला आहे.

महिला पोलिसांचा असाही सन्मान

जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांचा महिलांकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पोलीस खात्यात रूढ झालेल्या कार्यपद्धती पेक्षा अत्यंत हटके आणि उदार म्हटला जातो. एरवी पोलीस कर्मचारी स्त्री असो की पुरुष त्यांना कठोरपणे हाताळले जाते. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दिवस असो की रात्र न पाहता ड्यूटी लावली जाते. परंतु अधीक्षक पी आर पाटील यांनी महिलांना कौटुंबिक जबाबदारीची पार्श्वभूमी असते हे लक्षात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन आणि स्वरुपात पालट घडविले आहेत. त्याचबरोबर विशेष गुण वैशिष्ट्य हेरून जबाबदाऱ्या सोपवत नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील काही महिला कर्मचाऱ्यांना पुढे येण्याची संधी दिली आहे. महिला दिना पुरता नव्हे तर दैनंदिन कार्यपद्धतीत त्यांनी महिलांचा सन्मान ठेवला आहे, असे पोलीस दलातील काही कर्मचारी सांगतात. दरम्यान आज आठ मार्च रोजी जगातील महिला दिनानिमित्त जिल्हा पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची मोटर सायकल रॅली आयोजित करण्यात आली असून त्याद्वारे शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट वापरा विषयीची जागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चांगले कार्य करणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!