नंदुरबार (योगेन्द्र जोशी) : सातपुड्यातील होळी नृत्यपथकांना राज्यात किंवा देशभरात कुठल्याही कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर करायला मनाई करणारा ठराव काठी (ता.अक्कलकुवा) येथे झालेल्या आदिवासी महापंचा यतीत करण्यात आला. आदिवासी देवतांच्या पुजाविधीतील पावित्र्याचा संदर्भ असल्याने होळी नृत्य अन्य केव्हाही कुठेही सादर करण्यास मनाई करणारा हा ठराव करण्यात आल्याचे संबंधीत मान्यवरांनी स्पष्ट केले आहे.
आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी एकता परिषदसह अन्य विविध आदिवासी संस्था, संघटनांतर्फे नुकतेच “आदिवासी सांस्कृतिक रूढी, परंपरा महापंचायती”चे आयोजन करण्यात आले होते. सोहळे, कार्यक्रम आदिवासींचे असो की, बिगर आदिवासींचे असो प्रेक्षकांना आकर्षित करतात म्हणून आदिवासी नृत्य पथकांना विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रित केले जाते. सातपुड्यातील होळी नृत्य पथकांना बडे पुढारी, नेते, मंत्री यांसारख्या पाहुण्यांचे स्वागत, राजकीय पक्षांचे कार्यक्रम सोहळे अशा ठिकाणी तसेच लग्नातील वेगळेपणा, गणपती विसर्जन व अन्य कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी आदिवासी नृत्य पथकांना ऊपस्थित ठेऊन सादरीकरण केले जाते. आदिवासी संस्कृतीचा अभिमान दर्शविण्यासाठी असे करण्याची प्रथा वाढत चालली आहे. परंतु या अशा गोष्टी आदिवासी संस्कृती संवर्धनातील मोठा अडथळा असल्याचे मत महापंचायतीत मांडण्यात आले. हे नृत्य केवळ होळीच्या कालावधीतच सादर करता येते, होळीचा व्रतधारी व्यक्तीच हे नृत्य सादर करू शकतो. या व्रताचे महिनाभर काटेकोर पालन करावे लागते, यामुळे नियंत्रण आणण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.
याच बरोबर होळी नृत्य आणि लग्न प्रसंगी केले जाणारे विधी आणि करावयाचे वर्तन या संबंधित सुधारणा लागू करणारे ठराव देखील करण्यात आले जे सातपुड्याच्या दुर्गम भागात बदलाचे वारे वाहू लागल्याचे संकेत देणारे मानले जात आहेत.
ते अन्य महत्वाचे ठराव असे :
होळी नृत्यातील बांबू टोप, दुधी, पिंपळवर्गीय फळांच्या माळा या साहित्यांच्या विधिवत त्यागानंतर गैरवापर टाळावा.व्रतधारी (पालनी पाळणारा) व्यतिरिक्त अन्य व्यक्तीने होळी नृत्य सादर करणे व साहित्यांचा स्पर्श टाळावा.
मेलादा, यात्रा व होळीत कर्णकर्कश आवाजाची खेळणी व वाद्य विक्रीवर बंदी करावी. होळीत छिबली नृत्य टाळावे. गाव पुजारांमार्फतच लग्नविधी केले जावेत. बनावट दारुची पूजाविधी टाळावी. वयाच्या २१ व्या वर्षाआधी मुला-मलींचे लग्न लावू नये. दहेज परतीचा वाद न्यायालयात घेऊन जाऊ नये. याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी जाताना महिलांनी आदिवासी पेहरावच परिधान करावा.
दुर्गम भागातील काठी संस्थानचे वारस पृथ्वीसिंग पाडवी, एकता परिषदेचे सी. के. पाडवी, दिलवरसिंग वसावे, अॅड. अभिजीत वसावे, अॅड. सरदारसिंग वसावे, नागेश पाडवी, जेलसिंग पावरा, वालसिंग राठवा, क्रांती राठवा, सानिया राठवा, बाज्या वळवी, केराम जमरा, सरपंच सागर पाडवी, करमसिंग पाडवी, वसावे मोतीराम गुरुजी, प्रेमचंद सोनवणे, डॉ.सायसिंग वसावे, बहादुरसिंग पाडवी, राजेंद्रसिंग पाडवी, गणपत पाडवी, अॅड. किरेसिंग पाडवी, ब्रिजलाल पाडवी, दिनू गावीत आदी सभेला उपस्थित होते.