नंदुरबार – गरोदर मातांचे बाळंतपण करण्याचं काम जवळपास 35 वर्षापासून करीत निर्हेतूक सेवा देणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध जनाबाईंचा जागतिक महिला दिनी सत्कार करण्यात आला. मात्र त्यांचे कार्यामुळे व ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे तो आपोआप कृतज्ञता सोहळाच होऊन गेला
85 वर्षीय महिला जनाबाई सिताराम भिल या भिलाईपाडा गावात गरोदर मातांचे बाळंतपण करण्याचं (सुईणीचं) काम जवळपास 35 वर्षापासून करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी शंभर ते दीडशे गरोदर मातांच सुरक्षितपणे बाळंतपण केलं असून जनाबाईचं कार्य वाखाणण्याजोगं आहे. त्याकाळी दवाखान्याच्या सोयी नव्हत्या. तेव्हापासून जनाबाई या आपल्या हातोटीने आणि अनुभवाने गरोदर मातांना धीर देत सुखरूप बाळंतपण करीत आल्या. आज जरी दवाखान्यात बाळंतपण होत असेल तरीही प्रत्येक घरी स्वतःहून जाऊन गरोदर मातेस मार्गदर्शन करत धीर देत असतात व उपाय सांगत असतात. हे कार्य त्या निस्वार्थपणे कुठलाही मोबदला न घेता करतात, हे विशेष. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचा दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा भिलाईपाडा व ग्रामपंचायत भिलाईपाडा ता.जि. नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला.
तसेच नांदरखेडा उपकेंद्रातील सिस्टर हर्षला पिंगळे व रेणुका ताई यांनी कोरोंना काळात कुठलीही भीती न बाळगता रुग्णांना सेवा देणे तसेच लसीकरणासाठी घरोघरी जाऊन अहोरात्र कर्तव्य करून गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून घेतले. म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात आला. गावातील माता-भगिनींना आरोग्या विषयी, गरोदरपणातील समस्याविषयी तसेच शासनाच्या विविध योजनांविषयीची माहिती नांदखेडा आरोग्य केंद्राचे सी.एच. ओ.डॉ.संदीप काकुस्ते व पिंगळे यांनी दिली.
सूत्रसंचालन उपशिक्षिका वृषाली नांद्रे यांनी केले यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी.एस.अहिरे संजय वळवी मंगलबाई वळवी,रंजना वळवी, शांता गावित, अंजना मोरे,आनंदी पाडवी, लक्ष्मी मोरे, ललिता सोनवणे, हिराबाई ठाकरे,सयाबाई पाडवी, सोनी ठाकरे, संगीता ठाकरे,सुगंधा गावित, चमेली वळवी, अनिता वळवी ,यांनी सहभाग घेतला.आभार मुख्याध्यापक संतोष नांद्रे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आंगनवाडी सेविका अनसू वळवी,आशा वर्कर उषा वळवी यांनी सहकार्य केले.