..अन्यथा छत्रपती नाट्यमंदिराला कुलूप ठोकू; घरपट्टी वसुलीतला भेदभाव थांबवा: माजी आमदार शिरिष चौधरी

नंदुरबार- घरपट्टी थकीत राहिली म्हणून सामान्य नागरिकांची जाहीर फलकावर यादी लाऊन अपमानित करणे बंद करा व नगरपालिकेच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांचे थकीत कर आधी भरा; अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी येथील नगरपालिका चौकात निदर्शने करीत जाहीर निषेध नोंदवला.
नगरपालिकेने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या समर्थकांना वापरायला दिलेल्या मालमत्तांचा वापर करणाऱ्या संस्थांकडील कर वसूल केला नाही आणि ही जुलमी घरपट्टी वसुली थांबवली नाही, तर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जाऊन तेथील आमदार कार्यालयाला कुलूप ठोकले जाईल, असा ईषारा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी याप्रसंगी दिला.
नंदुरबार नगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीची चालवलेली मोहिम वादग्रस्त बनली असून भारतीय जनता पार्टी त्याविरोधात आक्रमक बनली आहे. लोकांना अपमानित करून घरपट्टी वसुली करणे अत्यंत निंदनीय आहे, असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, नगरपालिकेतील भाजपाचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. 28 मार्च 2022 रोजी मोठ्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्याचा प्रारंभ म्हणून आज सकाळी 11 वाजता जुन्या नगरपालिकेबाहेर कॉर्नर सभा घेण्यात आली.
आज पासून रोज प्रत्येक वार्डात अशा कॉर्नर सभा घेण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. त्याचबरोबर नगरपालिकेने लावलेल्या थकबाकीदारांच्या फलका शेजारी भाजपाच्या वतीने सत्ताधाऱ्यांकडून थकबाकी वसुलीत कसा भेदभाव केला जात आहे हे सांगणारा फलक देखील लावण्यात आला. तत्पूर्वी निदर्शने करीत निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
नगरपालिकेचे नेतृत्व करणारे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना जर नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीची इतकीच चिंता आहे, तर मग विकासकामांच्या नावाखाली नगरपालिकामाध्यमातून भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातूनच त्यांनी थकीत घरपट्टीच्या रकमा भरून द्याव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, हे आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे, असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी याप्रसंगी भाषणात म्हणाले.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्ता वापरणाऱ्या संस्थांकडे थकलेल्या लाखो रुपयांच्या थकित कराचा मुद्दा मांडून घणाघात केला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या समर्थकांना वापरायला दिलेल्या या मालमत्तांकडे कर थकीत असल्याचे अधिकृत पत्र नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी दिले असल्याचे जाहीरपणे सांगून घरपट्टी वसुलीत भेदभाव केला जात असल्याचा शिरीष चौधरी यांनी आरोप केला.
हेच ते मुख्याधिकाऱ्यांचे पत्र
या पत्राची कॉपी जाहीर फलकावर लावण्यात आली असून प्रत्येक वार्डात ते फलक लावण्यात आले आहेत. जर त्या संस्थांकडील कर वसूल केला नाही आणि ही जुलमी घरपट्टी वसुली थांबवली नाही, तर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जाऊन तेथील आमदार कार्यालयाला कुलूप ठोकले जाईल, असा ईषारा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी याप्रसंगी दिला.
गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी यांनीही रघुवंशी यांनी बगलबच्च्यांना चालवायला दिलेल्या नाट्यमंदिर, इंदिरा मंगल कार्यालय, सीबी गार्डन आदी संस्थांकडे लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मग त्यांचं नाव फलकावरच्या यादीत का नाही? असा प्रश्न करीत निषेध नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!