गोमूत्राने जलप्रदूषणावर परिणामकारक उपाय शक्य !

जागतिक ख्यातीप्राप्त ‘नेचर’ नियतकालिकात दावा

कोल्हापूर – शिवाजी विद्यापिठाचे विद्यार्थी प्रशांत सावळकर आणि ऋतुजा मांडवकर या २ युवा संशोधकांनी देशी गीर गायीच्या मूत्राच्या (गोमूत्राच्या) साहाय्याने चांदी धातूचे विघटन करून त्यापासून रूपेरी सूक्ष्म कण (नो पार्टिकल्स) सिद्ध केले आहेत. ‘चांदीचे हे अब्जांश कण (सिल्व्हर नॅनो पार्टिकल्स) वस्त्रोद्योगातून बाहेर सोडल्या जाणार्‍या अत्यंत विषारी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरता येऊ शकतात’, असे संशोधनातून समोर आले आहे.
      हे संशोधन २० ऑगस्ट २०२१ या दिवशी लंडनच्या जगप्रसिद्ध ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. ‘सिल्व्हर नॅनो पार्टिकल्स’ आणि अतीनील किरणे यांच्या जैवरासायनिक अभिक्रियेचा वापर करून वस्त्रोद्योगातील घातक रंग अन् रासायनिक पदार्थ (‘मिथिलीन’ आणि ‘क्रिस्टल’) या जलप्रदूषण करणार्‍या महत्त्वपूर्ण घटकांचे विघटन सहजपणे करता येऊ शकते. ‘१ लिटर प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी ०.१ ग्रॅम द्रव पदार्थ पुरेसा आहे’, असेही या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनामुळे आता वस्त्रोद्योगामुळे नद्या, सरोवरे आदींच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येणार आहे. चांदीच्या अब्जांश कणांचा वापर भारतीय प्राचीन परंपरा लाभलेल्या आयुर्वेदात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला आहे. आयुर्वेदात चांदीचे सूक्ष्म कण ‘रौप्यभस्म’ म्हणून ओळखले जाते.
   या संशोधनासाठी शिवाजी विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. पी.एस्. पाटील, डॉ. नीरज प्रसाद, डॉ. गणेश कांबळे आणि ‘नॅनो सायन्स’ विभागाचे प्रमुख डॉ. किरणकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. हे संशोधन ‘नेचर’ नियतकालिकाच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिके (लिंक)वर वाचता येऊ शकते : https://www.nature.com/articles/s41598-021-96335-2
     ‘गीर गायीसारख्या भारतीय देशी गायीच्या मूत्रामध्येच अनेक रोग बरे करण्याचे सामर्थ्य, तसेच प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आहे. संकरित गायींच्या मूत्रामध्ये ही क्षमता नाही’, असेही या संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधाद्वारे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!