दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांना चार महिन्यांसाठी पोहोचले 21 हजार क्विंटल धान्य

नंदूरबार – जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या दऱ्या- खोऱ्यातील दुर्गम व अतिदुर्गम अशा 64 गावामध्ये राहणाऱ्या 52 हजार 595 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने महसूल आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार 520 एवढा क्विंटल गहू, 16 हजार 109 क्विंटल तांदूळ आगामी चार महिन्यांसाठी पोहोचविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.

“नंदूरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. पावसाळ्यात दुर्गम आणि अतिदुर्गम असलेल्या नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे म्हणून चार महिन्यांचे एकत्रित अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी तहसिलदार आणि पुरवठा शाखेचे अधिकारी  तसेच कर्मचाऱ्यांना  निर्देश देण्यात आले आहेत.” *-मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदूरबार*

नंदूरबार जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे तापी नदी ओलांडली की सुरू होतात त्या पूर्व- पश्चिम पसरलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा. या डोंगर रांगेतील दऱ्या- खोऱ्यात आदिवासी बांधव नर्मदा नदीच्या काठावर वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत. त्यापैकी अनेकांचा उदरनिर्वाह हा वनोपजांवर आणि हंगामी शेतीवर अवलंबून. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

पावसाळा सुरू होत असल्याने नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आणि पावसाळ्यात जवळपास संपर्क तुटणाऱ्या 64  गावांमधील नागरिकांना  चार महिने पुरेल इतका अन्नधान्याचा पुरवठा व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात प्रशासनाच्या वतीने पोहचविण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा नदीच्या काठावरील उडद्या, बादल, भामाणे, सावऱ्यादिगर, भाबरी,  मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, मुखडी, डनेल हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे या भागात पावसाळ्यात वाहने जात नाही.

पावसाळ्याच्या परिस्थीतीत येथील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने त्यांना पावसाळ्याचे चार महिने (जून ते सप्टेंबर) पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. या बहुतांश गावामध्ये जाण्यासाठी बोटीने जावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील बाधित अनेक प्रकल्पग्रस्त या भागात वास्तवव्यास आहेत. या गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य या गावाना पावसाळ्यापूर्वी धान्य पोहोचविण्यात येवून हे लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. अक्राणी तालुक्यातील उडद्या, बादल, भामाणे, सावऱ्यादिगर, भाबरी या पाच गावांना तर अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली,धनखेडी,चिमलखेडी,बामणी, मुखडी,डनेल अशा सहा गावांना नवसंजीवनी योजनेंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य बार्जद्वारे पोहोचविण्यात येत आहे.

*नवसंजीवनी योजनेतंर्गत समाविष्ट 64 गावे*

अक्राणी तालुक्यातील झुम्मट, उडद्या, बादल, भामाणे,भूषा/खर्डी खु, सावऱ्या दिगर, वेलखेडी, मोडलगाव,गोरबा,जुगणी, हाकडी केली, पोला, पिंपळचोप, अठी, थुवानी केली, निमगव्हाण, शेलगदा, माकडकुंड, गोरडी, कुभरी, रोषमाळ खु.आकवाणी, माळ, बिलगाव, गेंदा, तीनसमाळ, चिचखेडी/ शिक्का/ भरड, डुठ्ठल, वाहवाणी,आग्रीपाडा, नलगव्हाण, गोरडी, डुठ्ठल, निमखेडी, शेलदा, कुभरी, बोरसिसा, भाबरी, खडकी, झापी, फलई, कुंड्या, सिंदी दिगर, सावऱ्यालेकडा, केलापाणी, तोरणमाळ, तळोदा तालुक्यातील अक्राणी महल/ केलापाणी/ थुवापाणी. तर अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी,चिमलखेडी-2, बामणी, मुखडी, डनेल-2, निंबापाटी, बेटी, ओहवा-1 ओहवा-2, खाई, कोलवीमाळ, कंकाळमाळ, भराडीपादर, दसरापादर, गोरजाबारी,गोरजाबारी-2, चोप्लाईपाडा,डनेल-1 अशा 64 गावांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!