ट्रॅकमनची क्षुल्लक माहिती आणि २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी ठरली महत्वाची
नंदुरबार – ठोस धागा हाताशी नसताना आणि मयताची ओळख पटविण्याचे आव्हान असतानाही तालुक्यातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या युवतीच्या निर्घृण खून प्रकरणाचा ऊलगडा करण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत गुजरात राज्यातून तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२६ ऑगस्ट रोजी बिलाडी शिवारातील गट क्र. ४९८ च्या शेताच्या बांधाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ झाडाझुडपात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला होता. स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लाल कुर्ता व पांढरी पँट घातलेल्या त्या अनोळखी मृत महिलेचा एक हात धडापासून वेगळा पडलेला होता. दुसऱ्या हातावर तिक्ष्ण हत्याराने झालेल्या जखमा दिसत होत्या. त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात येऊन तपासाला गती देण्यात आली होती. परंतु ठोस धागा अथवा पुरावा हाती नसल्यामळे जिवेठार मारण्याचा उद्देश काय? हे उघडकीस आणण्याचे, मयताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. अशात दि.२९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना एका गुप्त बातमीदाराने पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांचे घरी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असल्याची माहिती दिली. तेथील फुटेज तपासून फार काही हाती आले नाही. कारण त्यात रात्रीच्या सुमारास एक तरुण व एक तरुणी नंदुरबारच्या दिशेने जातांना फुटेज मध्ये दिसून आले व तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मयताच्या कपड्यांशी मिळते जुळते होते. पण मिळालेले ते सी.सी.टी.व्ही. फुटेज रात्रीच्या अंधारातील असल्यामुळे अतिशय अस्पष्ट होते. तो धागा पकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा ढेकवद येथील रेल्वे ट्रॅकमनने दि. २४ ऑगस्ट रोजी सुरत ते भुसावळ पॅसेंजरमधुन एक तरुण व एक तरुणी ढेकवद स्टेशनला उतल्याचे पाहिले अशी माहिती दिली. मग लगेच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पाचोराबारी ते सुरत दरम्यान असलेल्या सर्व २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यासाठी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले. दि. ३१ऑगस्ट रोजी सुरत रेल्वे स्टेशन व स्टेशनच्या बाहेर असलेले सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेजचीही पाहणी करण्यात आली. त्यात सुरतच्या रेल्वे प्लॅट फॉर्मवर संशयीत आरोपी व मयत तरुणीच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या वर्णनाप्रमाणे कपडे घातलेली तरुणी एका रिक्षातून उतरतांना दिसले, म्हणून रिक्षा चालकाच्या मदतीने संशयीत इसम व मयत महिला यांचे मार्गक्रमण निश्चित केले. त्यांनी एका ठिकाणी रिक्षा बदललेली दिसली. त्या रिक्षा चालकाच्या मदतीने देखील पुन्हा मार्गक्रमण निश्चित केला. पुढे दि. ४ सप्टेंबर रोजी नवागांम सुरत येथील अल्ट्रा लाईफ स्टाईल या कपड्याच्या दुकानाचे सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करीत असतांना तेथे देखील संशयीत तरुण व मयत तरुणी हे दिसून आले. दुकान मालकाकडील माहितीच्या आधारे संशयित इसमास ताब्यात घेतले.
दि. ५ सप्टेंबर रोजी संशयीत इसम विनयकमार रामजनम राय (वय ३८) रा खमहौरी पो राजापर ता. राजगंज जि. सिवन, बिहार यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार येथे आणुन विचारपूस केली असता संशयीत आरोपीताने अतिशय धक्कादायक अशी माहिती दिली. मयत तरुणीचे नाव सिताकुमारी समदकुमार भगत (वय २४) रा. चमारीया चैनपुर ता. मशरक जि. छपरा असे आहे. या दोघांचे मागील दोन वर्षापासून प्रेम संबंध होते. परंतु मयत तरुणी दि.२३ ऑगस्ट रोजी बिहार येथून सुरत येथे आल्यानंतर विवाहासाठी तीने तगादा लावला. त्यावेळेस संशयीत तरुणाने आपण विवाहीत असल्याचे मयत तरुणीला सांगितले. त्याने त्यांचा वाद झाला. म्हणून संशयीत विनय हा तिला पुन्हा बिहार येथे तिच्या मुळ गावी सोडण्यासाठी सुरत येथुन दि.२ ऑगस्ट रोजी सुरत भुसावळ पॅसेंजरने निघाला होता, परंतु रेल्वेमध्ये देखील मयत तरुणी विनयशी वाद करत राहिली. म्हणून संतापात तो नंदुरबार तालुक्यातील ढेकवद रेल्वे स्थानकावर उतरला. मयत तरुणी देखील त्याच्या मागे ढेकवद रेल्वे स्थानकावर उतरली. काही वेळ पायी चालत गेल्यानंतर संशयीत विनयने रात्रीच्या अंधाराचा व एकांताचा फायदा घेत बिलाडी नंदुरबार शिवारात रेल्वे ट्रॅकजवळ बाजुला काटेरी झुडपात नेवून सदर तरुणीस ब्लेडने गळा चिरुन जिवे ठार मारल्याचे कबुल केले.
कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, नसतांना अतिशय क्लिष्ट व आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपीस गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक पोलीस अमंलदार किरण मोरे, यशोदिप ओगले, चालक पोलीस शिपाई सतिष घुले यांच्या पथकाने केली.