दगडफेकीच्या पार्श्वभूमिवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अक्कलकुव्यात केले सशस्त्र पथसंचलन

नंदुरबार –  व्हॉट्अॅप स्टेटसवर आक्षेपार्ह मजकुरासह फोटो प्रसारीत केल्याने धार्मीक भावना दुखावल्याविषयी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन परतणाऱ्या जमावाने तुफान दगडफेक करीत 40 वाहनांची नासधूस करीत जवळपास 20 लाखाचे नुकसान केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अक्कलकुव्यात आज दि.12 जून 2022 रोजी सशस्त्र पथसंचलन केले.
विशेष उल्लेखनीय हे आहे की, शहरवासीयांमध्ये संतप्त भावना असून तक्रार देऊन परतणाऱ्या जमावाच्या हाती इतक्या दगड विटांचा साठा कुठून आला? हे सर्व पूर्वनियोजित होते का? पुढील तपासात याची निष्पन्नता होईल का? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अक्कलकुवा शहरात दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने अचानक दगड विटांचा तुफान मारा करून विशिष्ट जमावाने मोठे नुकसान घडवत दहशत माजवली होती.
   दरम्यान दिनांक 10 जून 2022 रोजी दगडफेक करुन दहशत निर्माण करणा-या समाजकंटकांवर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून 28 संशयीतांना अटक करण्यात आली असून अक्कलकुवा शहरात सद्या शांततेचे वातावरण आहे. तथापि नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अक्कलकुवा शहरातील नागरिकांच्या मनातील भिती नाहिशी व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा; या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 12 जून 2022 रोजी अक्कलकुवा शहरात विशेषतः महत्वाच्या भागात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. त्यांच्या समवेत अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. संभाजी सावंत यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा, तळोदा, मोलगी, विसरवाडी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच राज्य राखीव पोलीस बल (SRPF) धुळे येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार उपस्थित होते. सकाळी 11 वाजता पोलीसांच्या सशस्त्र संचलनाची सुरुवात अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून तळोदा नाका, आमलीबारी फाटा, संजय नगर, मुख्य बाजार पेठ, झेंडा चौक, हनुमान चौक, परदेशी गल्ली, बस स्थानक व तेथून पुन्हा अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सशस्त्र संचलन समाप्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!